नवी दिल्ली : भारतातील जंतर-मंतरवर पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि 'कॉकरोच जनता पक्षाच्या' (CJP) आंदोलनाला पाकिस्तानमधील काही Gen-Z  गटांकडून मिळालेल्या पाठिंब्यावर भारत सरकारने अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. इतर देशांतील अशा अंतर्गत मुद्द्यांवर भाष्य करण्याऐवजी पाकिस्तानने स्वतःच्या देशातून चालणाऱ्या दहशतवादाचा अंत करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा खरमरीत सल्ला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिला आहे.

Continues below advertisement

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून भारताच्या विरोधात सीमापार दहशतवादाला खतपाणी घालत आहे, ही वस्तुस्थिती सर्वांनाच ठाऊक आहे.

MEA Spokesperson Statement : सीमापार दहशतवाद बंदीचीच मागणी

दिल्लीसह देशातील विविध शहरांत पार पडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही पाकिस्तानी तरुणांनी सोशल मीडियावरून भारतीय आंदोलकांना पाठिंबा दर्शवला होता. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रणधीर जयस्वाल म्हणाले की, "भारतातील नागरिक आणि तरुण (Gen Z) हीच मागणी करत आहेत की, पाकिस्तानने आपल्या देशातून होणारा दहशतवाद तात्काळ बंद करावा. आम्हाला आशा आहे की, पाकिस्तानातील तरुण आणि नागरिकही या महत्त्वाच्या मागणीकडे लक्ष देतील." 

Continues below advertisement

Pakistan Foreign Ministry On CJP : पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका

दुसरीकडे, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील या आंदोलनांवर अधिकृत टिप्पणी करण्याचे टाळले आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत त्यावर भाष्य करण्यास नकार दिला होता. मात्र, असे असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील अनेक तरुणांनी या निदर्शनांना पाठिंबा देत दोन्ही देशांच्या सामायिक इतिहासाचा संदर्भ दिला होता.

Indus Valley Civilization Claim : सिंधू संस्कृतीच्या दाव्यावर सडेतोड उत्तर

सिंधू संस्कृतीच्या (Indus Valley Civilization) सामायिक वारशासंबंधी पाकिस्तानने केलेल्या दाव्यांवरही रणधीर जयस्वाल यांनी जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, "दशकांपासून सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणारा, धार्मिक कट्टरता आणि हिंसाचाराला पाठिंबा देणारा देश कोणत्याही बहुलतावादी सांस्कृतिक वारशावर हक्क सांगू शकत नाही. अल्पसंख्याक आणि त्यांच्या सांस्कृतिक हक्कांचे रक्षण करण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा अत्यंत खराब रेकॉर्ड पाहता त्यांचे हे दावे केवळ दाखवण्यापुरते आहेत."

Indus Waters Treaty Context : दहशतवाद आणि सांस्कृतिक वारसा एकत्र अशक्य

नुकतेच पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी सिंधू संस्कृती हा पाकिस्तानच्या राष्ट्रीय ओळखीचा भाग असल्याचे विधान केले होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर भारताने 'सिंधू पाणी करार' (Indus Waters Treaty) स्थगित केला होता. पाकिस्तान-पुरस्कृत सीमापार दहशतवादामुळेच या कराराची मूळ भावना कमकुवत झाली आहे, असे भारताने ठामपणे स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचा: