Rahul Gandhi on Paper leak bill: या देशात तीन प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे विद्यार्थी, दुसरे म्हणजे मूर्ख आणि तिसऱ्या प्रकारात अंधभक्त येतात. यापैकी मूर्ख आणि अंधभक्तांना आपल्याला सगळे माहिती आहे, आपण देव आहोत, याची खात्री असते, असे खोचक वक्तव्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी लोकसभेत पेपरफुटी दुरुस्ती विधेयकावर सुरु असलेल्या चर्चेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी उपमा आणि रुपकांचा वापर करत सभागृहातील भाजप (BJP) खासदारांना अक्षरश: जेरीस आणले. राहुल गांधी यांनी कोणाचाही उल्लेख न करता मूर्ख लोकांची लक्षणे सांगितली. यावर समोरच्या बाकांवर बसलेले भाजपचे खासदार प्रचंड संतापले आणि त्यांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. (Parliament Monsoon Session 2026)
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितले की, मी एका विद्यार्थिनीशी बोलत होतो. मी तिला विचारलं, तू विद्यार्थी आहेस म्हणजे नेमकी काय आहेस? त्यावर तिने सांगितले की, विद्यार्थी म्हणजे खुल्या विचारांची आणि मनाची असणारी व्यक्ती. या व्यक्तीला नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा असते. मग मी त्या विद्यार्थिनीला विचारले की, दुसऱ्या प्रकारात कोणते लोक येतात? ती म्हणाली की, दुसऱ्या प्रकारात मूर्ख लोक येतात. त्यांना वाटतं, आपल्याला सगळं माहिती आहे, हे जग स्थिर आहे, सगळं ज्ञान आपल्याच आतून येतं, आपण देव आहोत असं त्यांना वाटतं, हे लोक उद्दाम असतात, ते इतरांचं ऐकत नाहीत, त्यांचं सत्य मान्य करत नाही. या लोकांना आपण मूर्ख म्हणतो. यानंतर तिसऱ्या प्रकारात अंधभक्त येतात. अंधभक्त असे लोक असतात जे मूर्खांना देव मानतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजप खासदारांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. राहुल गांधी संसदीय भाषेत बोलत नाहीत, अशी तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली. यावर लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी, तुम्ही विधेयकावरच बोला, बाकी गोष्टी बोलू नका, अशी सूचना राहुल गांधी यांना दिली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी वापरत असलेला 'मूर्ख' आणि 'अंधभक्त' हा शब्द असंसदीय असल्याचे सांगितले. यावर राहुल गांधी यांनी, मी एखाद्या खासदाराला मूर्ख बोललो तर त्यावर आक्षेप घेणे योग्य आहे, असे सांगितले. या देशात भक्त भाजपनेच बोलायचे असे तुम्हाला वाटत असेल तर मी शांत बसतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
गरीब विद्यार्थी तासनतास अभ्यास करतात आणि पेपर फुटतात. तर श्रीमंत मुलं 35-40 लाखांना पेपर विकत घेतात आणि गरिबांच्या संधी हिरावून घेतात. शिक्षणक्षेत्रात प्रचंड खासगीकरण होत आहे, पेपर फुटत आहेत, हे अत्यंत भयानक आहे. शिक्षणव्यवस्थेचा आत्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोंडून ठेवला आहे. राजनाथ सिंह म्हणतात, आम्ही युपीए सरकार नाही, आमचे मंत्री राजीनामा देत नाहीत. ते खरं बोलत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही वरवरची गोष्ट आहे. कारण धर्मेंद्र प्रधान यांनी कधी शिक्षणमंत्रालय चालवले नाही. आरएसएस शिक्षण मंत्रालय चालवत होती. विद्यार्थ्यांना याचा राग होता की, त्यांना हवे ते करु दिले जात नाही, प्रश्न विचारायची मुभा नाही, जे बोलायचे ते बोलू दिले जात नाही. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लादलेला इतिहास शिकावा लागत आहे. देशातील प्रत्येक विद्यापीठात ही परिस्थिती आहे. याठिकाणी संघाचे कुलगुरु आहेत. या लोकांना शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थी नव्हे अंधभक्त घडवायचे आहेत. या सगळ्याविरोधात देशाच्या आत्म्याने आवाज उठवला. आम्ही तुमचे अंधभक्त होणार नाही, तुम्ही आमचं भविष्य ठरवू शकत नाही, हे विद्यार्थी आंदोलनाने सांगितले. या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संघ आणि भाजपचा सामना करण्याचे धैर्य नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
देशाच्या गृहमंत्र्यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने मारा करण्याचे आदेश दिले, असा आरोपही राहुल गांधी यांनी सभागृहात केला. पोलीस आणि सुरक्षा दलांचा वापर गृहमंत्र्यांच्या किंवा पंतप्रधानांच्या आदेशानेच केला जातो, असे राहुल यांनी म्हटले. यावर भाजपच्या खासदारांनी पुन्हा प्रचंड गोंधळ घातला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी राहुल गांधी यांना संसदीय मर्यादांचे पालन करा नाहीतर मी पुढच्या वक्त्याला बोलायची संधी देईन, असा इशारा दिला. त्यावर राहुल गांधी यांनी, 'माझा माईक तरी चालू करा, मला बोलू द्या', अशी मागणी केली. यावरुन सभागृहात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला.
आणखी वाचा
