सीआयडी ऑफिसरचा गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2018 03:42 PM (IST)
बिनय भट्टाचार्य हे पश्चिम बंगालमधील सीआयडीच्या बरासत सेक्शनमध्ये उप-निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
प्रातिनिधीक फोटो
कोलकाता : पश्चिम बंगालमधील सीआयडी ऑफिसरने गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बिनय भट्टाचार्य असे या सीआयडी ऑफिसरचे नाव असून, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्यावर एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. बिनय भट्टाचार्य हे पश्चिम बंगालमधील सीआयडीच्या बरासत सेक्शनमध्ये उप-निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्वत:च्याच सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून बिनय भट्टाचार्य यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या रुममधून मोठ्याने आवाज आल्यानंतर इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी बिनय भट्टाचार्य रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. भट्टाचार्य हे वैयक्तिक कारणांमुळे तणावात असल्याचा अंदाज सीआयडीतीलच इतर अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. मात्र, त्यांनी हे पाऊल उचलण्यामागचे नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.