पाटणा : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चिराग पासवान यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ही धमकी इन्स्टाग्रामवरुन एका आरोपीनं दिली आहे. त्या पोस्टमध्ये चिराग पासवान यांना 20 जुलैपर्यंत बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

पक्षाच्या नेत्यांकडून तक्रार दाखल

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) च्या नेत्यांनी या प्रकरणी तातडीनं सायबर क्राइम पोलीस स्टेशन, पाटणा येथे तक्रार दाखल केली आहे. पार्टीचे मुख्य प्रवक्ते डॉ. राजेश भट्ट हे स्वत: सायबर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी एफआयर दाखल केली. त्यांनी मीडियासोबत बोलताना म्हटलं की हा केवळ एका व्यक्तीवर हल्ला नसुन लोकशाही व्यवस्थेवर आणि दलित नेतृत्त्वावर थेट हल्ला आहे. हे कोणत्याही परिस्थिती मान्य केलं जाणार नाही. 

डॉ. राजेश भट्ट पुढं म्हणाले की ज्या प्रकारे सोशल मीडियाचा वापर राजकीय नेत्यांना घाबरवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी होत आहे तो चिंतेचा विषय आहे. हा प्रकार देशाच्या अंतर्गत सुरक्षा आणि लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. पोलीस आणि सायबर क्राइम तज्ज्ञ ज्या अकाऊंटवरुन धमकी देण्यात आली त्याचा शोध घेत आहेत. प्रशासनानं देखील याची गंभीर दखल घेतली आहे. 

चिराग पासवान यांना झेड सुरक्षा

चिराग पासवान हे केंद्रीय मंत्री असल्यानं त्यांना झेड सुरक्षा आहे. झेड सुरक्षेत एकूण 33 सुरक्षा रक्षक असतात. हे सुरक्षा रक्षक 24 x7 मंत्र्यांसोबत असतात. याशिवाय 10 आर्ड स्टॅटिक गार्ड आणि व्हीआयपीच्या घरात राहतात. याशिवाय 6 राऊंड द क्लॉक पीएसओ आणि 12 कमांडो मंत्र्यांसोबत प्रत्येक ठिकाणी असतात. ही सुरक्षा सीआरपीएफची व्हीआयपी सिक्युरिटी विंग देते.  

चिराग पासवान यांची 243 जागा लढवण्याची घोषणा

बिहार विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा चिराग पासवान यांनी केली आहे. केंद्रात एनडीएमध्ये सोबत असले तरी चिराग पासवान बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेतात की काय अशा चर्चा आहेत. बिहार विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात देखील चिराग पासवान निर्णय घेऊ शकतात.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत  नितीश कुमार यांजा जेडीयू आणि भाजप हे एनडीएच्या वतीनं रिंगणात असतील. तर, राजद आणि काँग्रेस महागठबंधन म्हणून रिंगणात असतील.