Rahul Gandhi on Regional parties : उदयपूरमध्ये  सुरु असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा समारोप झाला. या शिबिरामध्ये काँग्रेसने विविध ठराव केले आहेत. तसेच पक्षात मोठ्या सुधारणांची घोषणा देखील करण्यात आली आहे. समारोपाच्या दिवशी राहुल गांधी यांनी उपस्थित नेत्यांना संबोधीत केलं. यावेळी त्यांनी भाजपसह आरएसएसवर जोरदार निशाणा लगावला. भाजपला फक्त काँग्रेसच पराभूत करु शकते. प्रादेशिक पक्षांना भाजपला पराभूत करणे शक्य नसल्याचे राहुल गांधी यांनी आपल्यात भाषणात म्हटले आहे.


दरम्यान, राहुल गांधींच्या या वक्तव्यावर प्रादेशिक पक्षांनी मात्र, नाराजी व्यक्त केली आहे.  राहुल गांधींचे हे बालिक वक्तव्य असल्याचे प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेस देशाच्या राजकारणासाठी किती घातक आहे, हे चिंतन शिबिराच्या निष्कर्षावरुनच दिसून येत असल्याचे समाजवादी पार्टीने म्हटले आहे. तर आरजेडीचे पर्शन रामबली सिंह म्हणाले, की भाजप सध्याच्या काळात खूप मजबूत आहे. प्रादेशिक पक्षाच्या सहकार्याशिवाय काँग्रेस पक्ष त्यांना पराभूत करण्यासाठी काहीही करु शकत नसल्याचे रपर्शन सिंह म्हणाले. तर जेडीयूचे प्रवक्ते अभिषेक झा यांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्यावर टीका केली आहे. 


यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवरही टीका केली. आरएसएस आणि भाजपची विचारधारा देशासाठी धोकादायक आहे. मोदी सरकारने केलेली नोटबंदी आणि जीएसटीने देशाचा कणा मोडला आहे. त्यामुळे आता वाढती महागाई, बेरोजगारी अशा समस्यांचा सामना जनतेला करावा लागत असल्याचे गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी प्रादेशिक पक्षांवरही जोरदार निशाणा साधला. भाजपला जर कोणी पराभूत करु शकत असेल तर ते फक्त काँग्रेसच करु शकते. प्रादेशिक पक्षांकडे अशी विचारधारा नाही की ते भाजपला पराभूत करु शकतील.


राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसचे तीन दिवसांचे चिंतन शिबिर पार पडले. काल त्या शिबिराची सांगता झाली. शिबिराच्या शेवटच्या दिवशी काँग्रसची भविष्यातील वाटचाल कशी असेल याबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. यासोबतच हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले. यावेळी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा लगावला. तसेच राहुल गांधी यांना पुन्हा एकदा अध्यक्ष करण्याची मागणी चिंतन शिबिरात करण्यात आली आहे.