Chinook Helicopter: अमेरिकन सैन्याने त्यांच्या सर्व चिनूक हेलिकॉप्टरच्या (Chinook CH-47 Helicopter) उड्डाणांवर बंदी घातली आहे. या हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र भारतीय हवाई दल अद्यापही या CH-47 हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. हवाई दलाने या हेलिकॉप्टरवर अमेरिकेतील निर्बंधांबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.
अमेरिकेची मोठी कंपनी बोईंगने (Boeing) लष्करासाठी हे खास हेलिकॉप्टर तयार केले आहेत. मार्च 2019 मध्ये भारतीय लष्करानेही याचा वापर सुरू केला. हवाई दलाने आपल्या ताफ्यात 15 चिनूक हेलिकॉप्टरचा (CH-47) समावेश केला होता. ज्याचा लष्कर सातत्याने वापर करत आहे.
वृत्तसंस्था एएनआयने सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अमेरिकेतील चिनूक हेलिकॉप्टरचे सर्व उड्डाण थांबवल्यानंतर बोईंगकडून याबाबत अहवाल मागवण्यात आला आहे. सध्या भारतीय हवाई दलात चिनूक हेलिकॉप्टरचा वापर सुरू असून, बोईंगकडून माहिती मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. भारतात चिनूक हेलिकॉप्टर सध्या दोन ठिकाणी तैनात आहेत. याचा निम्मा ताफा चंदीगडमध्ये आहे. तर काही हेलिकॉप्टर आसाम एअरबेसवरही तैनात करण्यात आले आहेत. त्यांचा उपयोग लष्कराच्या जड वस्तू किंवा शस्त्रे एअरलिफ्ट करण्यासाठी केला जातो.
दरम्यान, अमेरिकेत CH-47 चिनूक हेलिकॉप्टरचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत बातमी दिली होती. ज्यात 1960 पासून अमेरिकन सैन्य या हेलिकॉप्टरचा वापर करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र आता चिनूक हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये आग लागण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन हवाई दल आणि लष्कराने त्याचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी अद्याप हेलिकॉप्टरच्या आगीच्या घटनेत अद्याप कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या बातमीत सांगितलं आहे.