नवी दिल्ली : एलएसीवर भारतीय क्षेत्रांमध्ये चीनच्या हालचाली वाढत असल्याचा उल्लेख सरंक्षण मंत्रालयाच्या दस्तऐवजांमध्ये आहे. त्यामुळे भारत आणि चीनमधील तणाव आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाच्या दस्तऐवजांमध्ये 15 जूनचाही उल्लेख करण्यात आला आहे. 15 जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारतीय सैन्याचे 20 जवान शहीद झाले होते. ज्यात कर्नल रँकच्या अधिकाऱ्याचाही सामावेश होता. तर भारताच्या प्रत्युत्तरात चिनी सैन्याचंही मोठं नुकसान झालं होतं.
दस्तऐवजांमध्ये म्हटलं आहे की, चीनच्या बाजूने कुगरांग नाला (हॉट स्प्रिंग्सच्या उत्तरेत पेट्रोलिंग पॉईंट-15 जवळ), गोगरा (पीपी-17 ए) आणि पँगोंग त्सोच्या उत्तरेकडील भागात 17 ते 18 मे रोजी घुसखोरी झाली होती. हे दस्तऐवज संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर 4 ऑगस्ट रोजी अपलोड केले होते.
5 मे नंतर चीनची ही आक्रमकता एलएसीवर दिसून येत आहे. 5 आणि 6 मे रोजीच पँगोंग त्सोमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झटापट झाली होती. या दस्तऐवजांनुसार, चीनने 17 आणि 18 मे दरम्यान लडाखच्याकुंगरांग नाला, गोगरा आणि पँगोंग त्सो तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर अतिक्रमण केलं होतं.
चिनी सैन्याला चर्चेच्या पाचव्या फेरीत भारताचा इशारा
भारतीय सैन्याने चिनी सैन्याला चर्चेच्या पाचव्या फेरीत स्पष्ट इशारा दिला होता की, आम्ही देशाच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. भारताने म्हटलं होतं की, पंगोंग त्सो आणि लडाखच्या पूर्वेला इतर वादग्रस्त भागांमधून चिनी सैन्याने लवकरात लवकर माघार घ्यायला हवी.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सैन्याच्या वरिष्ठ कमांडर स्तराच्या अधिकाऱ्यांनी रविवारी एलएसीवर चीनमधील मोल्दोमध्ये सुमारे 11 तास बातचीत केली.
या घटनाक्रमाची लक्ष ठेवणाऱ्या जाणकारांच्या मते, भारतीय शिष्टमंडळाने स्पष्ट आणि कठोर शब्दात चीनला सांगितलं की, दोन्ही देशांमधील ताण निवळण्यासाठी पूर्व लडाखच्या सर्व क्षेत्रांमध्ये वाद सुरु होण्यापूर्वीची स्थिती निर्माण होणं आवश्यक आहे.