नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळं अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला काहीअंशी दिलासा देणारी बातमी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा होत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढाव्याबाबतची बैठक संपल्यानंतर ते बोलत होते. रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी शक्तिकांत दास म्हणाले की, रेपो रेट हा 4 टक्केच राहणार आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.3 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. 2020 मध्ये पहिल्या 6 महिन्यात आर्थिक घसरण झाली आहे, या काळात जगभरातील उत्पादन तसेच सेवा क्षेत्राला जबर फटका बसला आहे. दरम्यान, एप्रिलच्या तुलनेत आता आर्थिक व्यवस्था हळूहळू सुधारत आहे. कोरोना काळात जगभरात आयातीवर परिणाम झाला आहे. भारतात महागाईचा दर वाढताच राहिला आहे, असं ते म्हणाले.

लस आल्यास चित्र बदलण्याची शक्यता
येत्या काळात कोरोनाची लस आल्यास चित्र बदलण्याची शक्यता आहे, असं देखील दास म्हणाले. तसंच देशात यंदा चांगला पाऊस पडत असून यावरही शक्तिकांत दास यांनी समाधान व्यक्त केले. चांगल्या पावसामुळे खरिप पेरणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे शेती व्यवसायाला बळकटी येणार आहे. तसेच भारताची अर्थव्यवस्था उणे मध्येच राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या महागाई दर नियंत्रणात
दास म्हणाले की, एप्रिल महिन्याच्या तुलनेत देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होता आहे. कोरोनामुळे आयातीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसंच जगभरातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे, असं ते म्हणाले. देशात सध्या महागाई दर नियंत्रणात आहे. एकीकडे दुसऱ्या देशांच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट होत आहे. परंतु आपल्या परकीय चलनाच्या साठ्यातही वाढ होत आहे. जानेवारी ते जून या कालावधीत अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट होती, असंही दास म्हणाले.