मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर लागोलाग पाकिस्तानच्या पाठीशी नेहमी उभे राहणार असल्याचं सांगणाऱ्या चीनने (China) आणखी एक मोठा खुलासा केला आहे. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindhoor) सुरू असताना आपण भारताविरोधात पाकिस्तानला कोणतीही लष्करी मदत दिली नाही असं चीनने स्पष्ट केलं. त्यासंबंधी सोशल मीडियातून पसरत असलेली माहिती खोटी असल्याचंही चीनकडून सांगण्यात आलं. 

भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या वेळी तुर्की या देशाने कार्गो विमानातून पाकिस्तानला ड्रोन पुरवल्याची माहिती समोर आली. त्याचवेळी चीननेही पाकिस्तानला पाठिंबा दिला असून चीनचे Y-20 हे स्ट्रॅटेजिक ट्रान्सपोर्ट विमानही पाकिस्तानला गेले असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर चीनने त्यावर खुलासा केला.

China Stand On Operation Sindhoor : पाकिस्तानला मदत केली नाही, चीनचा दावा

सोशल मीडियावर पसरत असलेल्या बातम्या या खोट्या असल्याचं चीनने सांगितलं. चीनने भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कोणतीही लष्करी मदत दिली नाही, असा खुलासा केला.

भारताकडून पाकिस्तानची सर्वबाजूंनी कोंडी झाल्यानंतर त्याने चीनकडे मदत मागितल्याची माहिती आहे. पण चीनने पाकिस्तानच्या भूमिकेला जरी समर्थन केलं असलं तरी त्यांना कोणतीही लष्करी मदत दिली नसल्याचं सांगितलं. 'चीन नेहमी पाकिस्तानच्या पाठीशी असेल' असं नुकतंच चीनने स्पष्ट केलं. त्यानंतर भारतातून चीनच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली जाऊ लागली. 

तुर्कीने पाकिस्तानला कार्गो विमान पाठवून ड्रोन्स आणि इतर लष्करी मदत केली होती. त्यावर भारताने नाराजी व्यक्त केली होती. आता हे आपल्या बाबतीत होऊ नये यासाठी चीनने हा खुलासा केल्याची चर्चा आहे.

China Global Times : काय म्हटलंय ग्लोबल टाईम्सने? 

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) एअर फोर्सने पाकिस्तानला मदत पाठवण्याच्या संदर्भात नुकत्याच झालेल्या अफवांबद्दल खुलासा केला आहे. PLA एअर फोर्सने एका निवेदनाद्वारे सांगितले की, चीनच्या Y-20 स्ट्रॅटेजिक ट्रान्सपोर्ट विमानाने पाकिस्तानला मदत पाठवली असल्याची ऑनलाइन माहिती खोटी आहे आणि ती वस्तुस्थितीला धरून नाही. निवेदनात असे नमूद केले आहे की इंटरनेट हा कायद्यापासून मुक्त नाही आणि लष्करी संबंधित अफवा निर्माण करणे आणि खोटी माहिती पसरवणे यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.