मुंबई : आज 14 नोव्हेंबर अर्थात बालदिन. देशभरात आज मोठ्या उत्साहत बालदिन साजरा होत आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीला बालदिन साजरा केला जातो. यानिमित्ताने गुगल इंडियानेही आकर्षक डूडल बनवून बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्च इंजिन गुगल नेहमीच नवनवीन डूडल नेटिझन्सच्या भेटीला घेऊन येतं. आज बालदिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलच्या माध्यमातून लहान मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लहान मुले तसंच नेहरुंनी देशाला दिलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भेटीवर गुगलने डूडल साकारले आहे.  या डूडलमध्ये ग्रह, तारे आणि आकाशगंगा यांचं निरीक्षण करणारी लहान मुलगी दिसत आहे. तसेच अवकाशात झेप घेण्यासाठी सज्ज असलेलं एक यानही या डूडलमध्ये दाखवण्यात आले आहे. भारतात शाळांमध्ये हा बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच शाळांमध्ये विविध स्पर्धांचंही आयोजन केले जाते.

14 नोव्हेंबर 1889 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म झाला होता. नेहरुंची ‘चाचा नेहरु’ म्हणून ओळखले जायचे. नेहरुंना लहान मुलेही खूप आवडत होती. मुलांप्रती त्यांचे प्रेम लक्षात घेऊन, नेहरुंच्या स्मरणार्थ आणि त्यांचा जन्मदिवसानिमित्त हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.

भारतातच नाही तर जगभरातही बालदिन साजरा केला जातो. 1925 पासून बालदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्र संघाने  20 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून घोषित केला होता. मात्र विविध देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी हा दिन साजरा केला जातो.