नवी दिल्ली : मोठ्यांसोबत आता लहानग्यांनाही आधार कार्ड लागू होणार आहे. लहान मुलांसाठी बाल आधार कार्ड जारी करण्यात येणार असल्याची माहिती यूआयडीएआयनं ट्विटरव्दारे दिली आहे. हे बाल आधार कार्ड निळ्या रंगाचं असणार आहे.


सरकारी सेवेचा लाभ घेण्यासाठी ओळखीचा दाखला म्हणून केंद्र सरकारनं आधारला मान्यता दिली आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांचे आधार बनवताना आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा आधार नंबर तसेच मुलाच्या जन्माचा दाखला आवश्यक आहे.


पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकाचे आधार बनवण्यासाठी बायोमॅट्रिक तपशीलाची गरज भासणार नसल्याचंही ‘यूआयडीएआय’ने स्पष्ट केले आहे. कोणत्याही आधार केंद्रावर नवजात बालकापासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे आधार मोफत बनवण्यात येतील.

दरम्यान, सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचं करण्यात येत आहे. पण दुसरीकडे हाताच्या बोटांवरील रेषा अस्पष्ट झाल्यामुळे बायोमेट्रिकमध्ये ज्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पण त्यावरही 'यूआयडीएआय'ने नवा उतारा शोधला आहे. 1 जुलै 2018 पासून अश्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरुन नोंदणीकृत आधार कार्डाची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती यूआयडीएआयकडून सांगण्यात येत आहे.