MR Shah Retirement: देशाचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांनी सोमवारी (15 मे) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून निवृत्त न्यायमूर्ती एमआर शाह यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमाक सरन्यायाधीशांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती एमआर शाह यांना 'टायगर शाह' असं संबोधलं. तसेच, न्यायमूर्ती शाहांचं कौतुक करताना ते म्हणाले की, 'व्यावहारिक ज्ञान आणि उत्कृष्ट सल्ले' यांमुळं शहांची कॉलेजियमला निर्णय घेण्यात ​​खूप मदत झाली.


सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन (SCBA) द्वारे आयोजित केलेल्या न्यायमूर्ती एमआर शाह यांच्या निरोप समारंभात बोलताना, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती शाह यांच्या 'संवेदनशील आणि मुक्त स्वभावाचं' कौतुक केलं आणि म्हणाले की, शहांनी त्वरीत तंत्रज्ञानाचा अवलंब केला, ज्यामुळे न्यायालयातील सुनावण्या संपूर्णपणे पेपरलेस पार पडण्यास सुरुवात झाली. सरन्यायाधीश म्हणाले की, ते न्यायमूर्ती शाह यांना त्यांच्या साहस आणि लढाऊ भावनेसाठी 'टायगर शाह' म्हणतात.


एमआर शाहांचं कौतुक करताना सरन्यायाधीशांचा शायराना अंदाज 


न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, "9 नोव्हेंबर 2022 रोजी न्यायमूर्ती शहा यांचा कॉलेजियममध्ये समावेश झाला आणि त्याच दिवशी माझी सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली... कॉलेजियममध्ये ते माझ्यासाठी व्यावहारिक ज्ञानानं परिपूर्ण असलेले एक उत्तम सहयोगी आहेत. त्याच्याकडे उत्तम सल्ल्यांचा ठेवा असायचा. जेव्हा आम्ही अल्पावधीतच पहिल्या सात नियुक्त्या केल्या, तेव्हा आम्हाला खूप मदत झाली." न्यायमूर्ती एमआर शाह यांच्याबाबत बोलताना सरन्यायाधीशांनी पाकिस्तानी कवी ओबेदुल्ला अलीम यांचाही उल्लेख केला आणि म्हणाले, "आंख से दूर सही दिल से कहां जायेगा, जाने वाले तू हमारे याद बहुत आयेगा". 


न्यायमूर्ती एमआर शहा भावूक 


निरोप समारंभासाठी बारचे आभार मानताना न्यायमूर्ती भावूक झाले. ते म्हणाले की, कोणतीही भीती, दुजाभाव किंवा लोभ न बाळगता आपलं कर्तव्य बजावलं. वेळेवर न्याय मिळवून देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. सर्वांना विनंती आहे की, त्यांनी कोणतीही प्रकरणं तहकूब करण्याच्या संस्कृतीतून बाहेर पडावं आणि कोणतीही अनावश्यक स्थगिती देऊ नये. तरुण वकिलांना माझा आणखी एक सल्ला म्हणजे, विशेष उल्लेख किंवा स्थगितीचा अवलंब करून कायद्याचा व्यवसाय करू नका, तर स्वतःला (केससाठी) तयार करा.


न्यायमूर्ती शहा पुढे बोलताना म्हणाले की, निरोप नेहमीच वेदनादायक असतो. मी माझी खेळी खूप चांगली खेळली आहे. मी नेहमी माझ्या विवेकाचं पालन केलं आहे. मी नेहमी देव आणि कर्मावर विश्वास ठेवतो. मी कधीच कशाची अपेक्षा केली नाही. मी नेहमीच गीतेचं अनुसरण केलं आहे.


न्यायमूर्ती शाह माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हवाला देत म्हणाले, 'जो कल थे, वो आज नहीं हैं. जो आज हैं वो कल नहीं होंगे. होने, न होने का क्रम इसी तरह चलता रहेगा. हम हैं, हम रहेंगे, ये भ्रम भी सदा चलता रहेगा.'