मुंबई : इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलातील जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यात आज (बुधवारी) हा प्रकार घडला. जवानानांमध्ये काही कारणामुळे वाद झाला. त्यानंतर त्यातील एका जवानानं आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. या घटनेत पोलीस दलातील 5 आयटीबीपी जवानांचा मृत्यू झाला. नंतर गोळीबार केलेल्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. एकमेकांवर गोळीबार करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सकाळी ९ च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.


नारायणपूरचे पोलीस अधिक्षक मोहित गर्ग यांनी सांगितले की, नारायणपूर जिल्हातील कडेनार गावात स्थित आयटीबीपीच्या 45व्या बटालियनच्या शिबिरात जवानांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर एका जवानाने गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारात सहा जवानांचा मृत्यू झाला आणि दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीस अधिक्षक यांनी बोलताना सांगितले की, गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण सुट्टी न मिळाल्यामुळे जवानाने गोळीबार केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार, नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या काही गाड्या आणि मशीन्स जाळल्यामुळे छत्तीसगढमधील नारायणपूर चर्चेत आलं होतं.