चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईत मेट्रोचं काम सुरू असताना बस स्टॉपसमोरील रस्ता खचून अख्खी बस आणि कार रस्त्यावरील खड्ड्यात अडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.



बसमधील 35 प्रवाशांना ताबडतोब बसमधून उतरवण्यात आलं. बसचालकाने दिलेल्या माहितीनुसार बस स्ट़ॉपवर बस थांबलेली असताना अचानक रस्ता खचला आणि बसचे टायर खचलेल्या रस्त्यात धसू लागले.



चेन्नईत सध्या मेट्रोचं काम सुरु असल्याने खोदकाम सुरु आहे. भुयारी रस्त्याचं खोदकाम करत असताना ही घटना घडली, अशी माहिती मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली आहे.



बस आणि कार खड्ड्यात अडकल्यानंतर पोलिसांनी तातडीने वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी बस आणि कारला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. चेन्नईत गेल्या वर्षापासून रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत.