चेन्नई : हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर चेन्नईतील एका मेडिकलच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने नंगबक्कमच्या सलूनमध्ये मृत्यूच्या एक दिवस हेअर ट्रान्सप्लांट सीटिंग केलं होतं.

 

 

मृत विद्यार्थ्यांच्या मित्रांनी चेन्नईच्या वैद्यकीय शिक्षण संचलनालयात तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब उघड झाली. अॅनास्थेशियामुळे अॅलर्जी झाल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

 

 

तर स्टेट मेडिकल काऊंसिलने तीन डॉक्टरांना नोटीस पाठवून विचारणा केली आहे की, पात्र नसतानाही तुम्ही शस्त्रक्रिया का केली आणि तेही नॉन-मेडिकल सेंटरमध्ये?

 

 

तामिळनाडू मेडिकल काऊंसिलने मागील आठवड्यात आरोग्यविभागाकडे तक्रार करत माहिती दिली होती की, अॅडव्हान्स्ड रोबोटिक हेअर ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये 17 मे रोजी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या सेंटरमध्ये केवळ केस कापण्याचा आणि स्टायलिंगचा परवाना आहे. शिवाय शस्त्रक्रिया करावी लागेल, अशा कोणत्याही गोष्टीचा परवाना सेंटरकडे नाही.

 

 

हेअर ट्रान्सप्लांट प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्याला अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलं. इथे त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी प्रकृती खालावल्याने कुटुंबीय त्याला जवळच्याच ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून घेऊन गेले. अॅलर्जीमुळे अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती चेन्नई मेडिकल काऊंसिलच्या अध्यक्ष डॉ. के सेंथिल यांनी दिली.