ISRO Moon Mission Chandrayaan3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रो (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेबाबत (ISRO Moon Mission) मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-3 लाँच व्हेइकल म्हणजेच रॉकेटसोबत जोडलं गेलं आहे. चांद्रयान 3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.  इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 ला महत्त्वाचा भाग रॉकेट लाँचरसोबत जोडण्यात आला आहे. इस्रोने ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, 'चांद्रयान-3 ची एन्कॅप्स्युलेटेड असेंबली बुधवारी, 5 जुलै लाँच व्हेईकल (LVM3) शी जोडण्यात आलं आहे. लॉन्च व्हेईकल मार्क-III (LVM3) हे रॉकेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलं आहे. 


LVM3 रॉकेटसोबत जोडलं चांद्रयान-3


इस्रो (ISRO) ने ट्विट करून माहिती दिली आहे की, चांद्रयान-3 श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये LVM3 रॉकेटशी जोडलं गेलं आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण जुलै महिन्याच्या मध्यात होईल, असं भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे (ISRO) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, 13 ते 19 जुलै दरम्यान चांद्रयान 3 प्रक्षेपित करण्यात येण्याची शक्यता आहे.






पहिल्यांदाच चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार


चांद्रयान ही भारताची महत्वाची चंद्र मोहिम आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान 3 इस्रोच्या चंद्र मोहिमेतील तिसरं चंद्रयान आहे. याआधीच्या चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 प्रक्षेपित करण्यात आलं होतं. यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. पण आता चांद्रयान 3 चंद्रावरून उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करेल.






सतीश धवन स्पेस सेंटरमधून होणार प्रक्षेपण


चांद्रयान-3 LVM3 रॉकेटमध्ये बसवण्यात आलं आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इस्रोकडून चांद्रयान 3 लाँच व्हेइकलसोबत म्हणजेच LVM3 रॉकेटसोबत जोडल्यानंतर पुढील चाचणी आणि तपासणी सुरु आहे. चांद्रयान-3 लाँच व्हेईकल मार्क-3 द्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात येईल. प्रॉपेलंट मॉड्यूल 'लँडर' आणि 'रोव्हर'ला चंद्राभोवती 100 किमीच्या कक्षेत नेईल आणि चांद्रयान 3 अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.


फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल


भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचा महत्त्वाचा भाग चांद्रयान-3 हा चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 चा पुढील टप्पा आहे. चांद्रयान-3 अगदी चांद्रयान-2 सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही.  चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून चांद्रयान 3 साठी मदत घेण्यात येणार आहे. चांद्रयान 3 यूएन राव उपग्रह केंद्रातून प्रक्षेपित केलं जाणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची योजना आहे. चांद्रयान 3 च्या साहाय्याने चंद्रावर वैज्ञानिक उपकरणं पाठवून त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेच्या दृष्टीने ही मोहिम फार महत्त्वाची आहे.