श्रीहरिकोटा : इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संस्था अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताच्या चांद्रयान-2 या मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. 15 जुलैला पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान 2 चं लॉन्चिंग होणार आहे. इस्रो अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली, तसेच या मोहिमेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. तसेच या मोहिमेची माहिती देणाऱ्या एका वेबसाईटचे उद्घाटनही यावेळी डॉ. सिवन यांच्या हस्ते करण्यात आले.

चांद्रयान-2 या मोहिमेद्वारे ऑर्बिटर, लैंडर आणि रोवर पहिल्यांदाच चंद्रावर पाठवलं जाणार आहे. या मोहिमेसाठी तब्बल 800 कोटींचा खर्च येणार आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर उतरवणारा भारत हा जगातला चौथा देश बनणार आहे.

चंद्रावर पाणी असल्याचा शोध चांद्रयान एकच्या मोहिमेत लागला होता. आता चांद्रयान दोन मोहिमेत तिथल्य़ा वातावरणासह माती परिक्षणाची जबाबदारी असणार आहे. चांद्रयान 2 हे गेल्या 11 वर्षांपासून उड्डाणाच्या प्रतिक्षेत होत. 2008 साली चांद्रयान 1 ने उड्डाण घेतलं. त्यानंतर जगापाठीवर भारताची नवी ओळख निर्माण झाली. 2013 साली चांद्रयान 2 झेपावणार होतं. मात्र रशियानं प्रकल्पातून माघार घेतल्यानं उड्डाण रखडलं. असंख्य आव्हानं आणि अडचणींना मात करत अखेर चांद्रयान 2 झेपावणार आहे.

Chandrayaan 2 | चांद्रयान 2 झेप घेण्यास सज्ज, चंद्रावर रोवर उतरवणारा भारत जगात चौथा देश | ABP Majha



कशी असेल मोहिम चांद्रयान2 ?

  • चांद्रयान 2 चं लॉन्चिंग 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान होणार आहे

  • 6 सप्टेंबर 2019ला चांद्रयान चंद्रावर उतऱण्याची शक्यता आहे

  • चांद्रयान 2 साठी तब्बल 800 कोटींचा खर्च लागणार आहे


चांद्रयान2 मोहिमेची वैशिट्य काय?

  • चांद्रयान तब्बल 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतर पार करुन चंद्रावर पोहोचणार

  • चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान दोनला 55 दिवसांचा कालावधी लागणार

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर प्रज्ञान उतरेल

  • चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान चंद्रावरची माहिती कंट्रोल सेंटरला पाठणार


चांद्रयान2 मोहिमेतील अडचणी आणि आव्हान

  • अंतराळात चंद्राच्या गतीबरोबरच चांद्रयान दोनच्या गतीवर नियंत्रण ठेवणे

  • चांद्रयान दोन पृथ्वीपासून 3 लाख किमींच्या अंतरावर असल्यानं त्याच्याशी संपर्क कायम ठेवणे

  • चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर रोवर आणि लँडर विक्रम उतरवणे

  • चंद्रावरच्या तापमानासह धुळीचाही मोहिमेवर परिणाम होऊ शकतो