Chandrababu Naidu Arrest: आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील स्थानिक न्यायालयानं तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांची नजरकैदेची याचिका फेटाळल्यानंतर, टीडीपी नेत्याच्या कायदेशीर पथकानं आता जामीनासाठी उच्च न्यायालयात (High Court Of Andhra Pradesh) दोन याचिका दाखल केल्या आहे. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी या याचिकांमार्फत त्यांच्यावरील खटला रद्द करण्याची विनंती केली आहे. चंद्राबाबूंच्या या याचिकांवर बुधवारी (13 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे. यापूर्वी, विजयवाडा येथील स्थानिक न्यायालयानं चंद्राबाबू नायडू तुरुंगात अधिक सुरक्षित राहतील, कारण त्यांना नजरकैदेत असताना 'झेड-प्लस' सुरक्षा प्रदान केली जाऊ शकत नाही, असं म्हणत त्यांची याचिका फेटाळली होती. दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या कथित कौशल विकास महामंडळ घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली होती. सध्या त्यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.


चंद्राबाबू नायडूंचे वकील काय म्हणाले? 


चंद्राबाबू नायडू यांच्या बाजूनं ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून चंद्राबाबूंच्या सुटकेसाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी सोमवारी चंद्राबाबूंच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात यावं यासाठी याचिका दाखल केली होती. नायडू यांना अनेक वर्षांपासून 'झेड-प्लस' श्रेणीची सुरक्षा मिळत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी NSG कमांडो नेहमीच तैनात असतात. चंद्राबाबूंच्या वकीलांनी सांगितलं की, नजरकैदेची याचिका फेटाळण्यात आली आहे. चंद्राबाबू नजरकैदेत असतील तर त्यांना 'झेड-प्लस' सुरक्षा दिली जाणार नाही, त्यामुळे नायडू यांना नजरकैदेत ठेवण्यापेक्षा त्यांनी तुरुंगात राहणं हेच अधिक सुरक्षित आहे, असं ते चंद्राबाबूंच्या वकीलांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 


याव्यतिरिक्त, चंद्राबाबूंच्या वकीलांनी सांगितलं की, "न्यायालयानं म्हटलं की, जर नायडूंना झेड-प्लस सुरक्षा यशस्वीरित्या प्रदान करणं शक्य झालं असतं, तर त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले असते. सुरक्षेच्या दृष्टीनं तुरुंग अधिक योग्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. एसीबी कोर्टाकडून याचिका फेटाळल्याच्या आदेशाची प्रत मिळताच नायडू यांची कायदेशीर टीम नजरकैदेसाठी उच्च न्यायालयात जाईल."


आंध्र प्रदेश सीआयडी प्रमुख एन संजय यांनी त्यांच्या अटकेनंतर सांगितलं होतं की, नायडू यांना कौशल विकास महामंडळाशी संबंधित फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली आहे, ज्यामुळे राज्य सरकारचे 300 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.


चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी काय म्हणाल्या?


दरम्यान, नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी यांनी मंगळवारी बोलताना सांगितलं की, पतीच्या अटकेनंतर कुटुंबावर कठीण प्रसंग येत आहेत. नायडूंच्या सुरक्षेबाबत मला भीती वाटत होती. तसेच, कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे. आमचं कुटुंब नेहमीच जनता आणि पक्षासाठी समर्पित राहिलं आहे. मी तुम्हाला याबद्दल खात्री देऊ शकते. जेव्हा मी त्याच्या प्रकृतीबद्दल विचारलं, तेव्हा त्या म्हणाल्या की, ते ठीक आहेत, काळजी करण्याची गरज नाही.