नवी दिल्ली : जे लोक नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्यासाठी केंद्र सरकार एक धक्का देणारा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कारण, 2020 पूर्वी तयार झालेल्या BS-IV मानकांच्या वाहनांचं रजिस्ट्रेशन बंद करुन, ही वाहनं मोडित काढण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.


केंद्र सरकार या वाहनांच्या रजिस्ट्रेशनची कालमर्यादा 30 जून 2020 पर्यंत निश्चित करणार आहे. त्यासाठी सरकार लवकरच मोटर वाहन नियमात बदल करणार आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात कायद्याच्या मसुदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतंच नोटिफिकेशन प्रसिद्ध करुन जनतेकडून यावर मतं मागवली आहेत.

वाहनांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी, केंद्र सरकार 2020 नंतर BS-VI मानकांच्या वाहनांना परवानगी देणार आहे. ही वाहने 1 एप्रिल 2020 संपूर्ण देशभरात, तर एप्रिल 2018 पर्यंत राजधानी दिल्लीत धावण्यासंदर्भात यापूर्वीच आदेश दिले आहेत.

दुसरीकडे 2020 नंतर देशभरातील BS-IV या वाहनांवर बंदी घालण्यासाठी 'केंद्रीय मोटर वाहन संशोधन नियम 2017' हा कायदा लागू करणार आहे. या कायद्याच्या मसुद्यासाठी देशभरातील जनतेकडून, तसेच संबंधित व्यक्तींकडून यासंदर्भात मतं मागवली आहेत. 20 डिसेंबरपर्यंत ही मतं केंद्र सरकारकडे पाठवायची आहेत.

BS-IV संदर्भात केंद्राने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार, “इमीशन स्टॅण्डर्ड BS-IV प्रकारातील जी वाहनं 1 एप्रिल 2020 पूर्वी तयार झाली आहेत. त्यांना 30 जून 2020 नंतर रजिस्ट्रेशन मिळणार नाही.”

त्यामुळे नव्या वाहनं जी श्रेणी एम ( आठ आसनी कार), श्रेणी एन (ट्रक) अशा प्रकारात मोडतात. आणि ज्यांचे इमीशन स्टॅण्डर्ड BS-IV च्या प्रमाणे आहे. त्या वाहनांचं 30 सप्टेंबर 2020 नंतर रजिस्ट्रेशन होणार नाही.