धरमपूर (गुजरात) : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरुन विरोधकांनी बरीच टीका सुरु केली आहे. याचवेळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.


‘यापुढे काँग्रेसला औरंगजेब राजवटीच्या शुभेच्छा.’ अशा शब्दात त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीवर घणाघात केला. ते गुजरातमधील  धरमपूरमधल्या प्रचारसभेत बोलत होते.

‘राजाचा मुलगाच राजा होतो. त्यामुळे काँग्रेसमध्येही तसंच सुरु आहे. यापुढे काँग्रेसला औरंगजेब राजवटीच्या शुभेच्छा’ असं म्हणत मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

दरम्यान, पतंप्रधान मोदींच्या या टीकेला आता राहुल गांधी काय उत्तर देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला त्यावेळी काँग्रेस मुख्यालयात त्यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सुशिलकुमार शिंदे यांच्यासह आदी काँग्रेस नेते उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी राहुल यांचा एकमेव अर्ज आला आहे.

आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत काँग्रेसमधून एकानंही अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही, तर राहुल गांधी हेच काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष होतील आणि जर दुसरा अर्ज आलाच तर त्याचा अंतिम निर्णय १९ डिसेंबरला होणार आहे. मात्र, राहुल यांची निवड बिनविरोधच होण्याची अधिक चिन्हं आहेत.

दरम्यान, राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष असतील. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती असतील. याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे.

VIDEO :



संबंधित बातम्या :

राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरला!

‘घराणेशाही हीच काँग्रेसची परंपरा’, विरोधकांची जोरदार टीका

गेल्या 39 वर्षांपैकी 32 वर्ष काँग्रेसवर नेहरु-गांधी घराण्याचं राज्य