श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात पाकिस्तानकडून सीमेलगत अंदाधुंद गोळीबार सुरु आहे.  पाकच्या या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे.

या गोळीबारात सीमेलगतच्या गावात राहणारी एक महिलादेखील मृत्यूमुखी पडली आहे. तसंच एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पूंछमध्ये काल सकाळपासून अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. काल सकाळी नऊ वाजल्यापासून पाकिस्ताननं भारताच्या दिशेनं गोळीबार सुरु केला.

या गोळीबाराला भारतीय जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून युद्धासाठी वापरली जाणारी शस्त्रास्त्रं वापरली जात आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यात 55 वर्षीय रशिदा बेगम नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे, तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

सांबामध्येही शस्त्रसंधीचं उल्लंघन

सांबाच्या रामगढ भागातही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. भारताच्या सीमेलगत असलेल्या सैन्याच्या चौक्यांना लक्ष्य केलं जात आहे. पाकिस्तानकडून फायरिंगसोबतच मोर्टार शेलही डागली जात आहे. या हल्ल्याला बीएसएफकडून चोख प्रत्यूत्तर दिलं जात आहे.