CDS Bipin Rawat Helicopter Crash :  हेलिकॉप्टर दुर्घटनेत  सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी, जवान यांचे निधन झाले. त्यांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबाबत लोकसभेत निवेदन दिले. यावेळी त्यांनी या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले. 


राजनाथ सिंह यांनी काय म्हटले ?


हेलिकॉप्टरमधील 14 पैकी 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह अधिकारी-जवानांचा समावेश होता. एअर चीफ मार्शल चौधरी यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.. या घटनेची चौकशी एअरफोर्स एअर मार्शल मानवेंद्रसिंह यांच्या नेतृत्त्वात चौकशीचे आदेश दिले आहेत.  मिलिट्री ऑनरसह अंत्यसंस्कार केले जातील. मी देशाच्या वतीने सर्वांना श्रद्धांजली अर्पित करतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. राजनाथ सिंह यांच्या निवदेनानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक संदेश वाचून दाखवला. 





राजनाथ सिंह यांनी लोकसभेत म्हटले की , सीडीएस जनरल रावत आणि इतरांचे पार्थिव आज सायंकाळी दिल्लीत आणले जाणार आहे. बुधवारी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांवर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. स्थानिकांना जंगलात लष्कराच्या हेलिकॉप्टरला आग लागली असल्याचे दिसून आले. अपघातानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. 


भारतीय हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यांनी घटनास्थळी आणि वेलिंग्टन येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या अपघाताच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.


पाहा व्हिडिओ: राजनाथ सिंह यांचे CDS Bipin Rawat हेलिकॉप्टर दुर्घटनेप्रकरणी लोकसभेत निवेदन 


 



हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला


बुधवारी सकाळी तामिळनाडूतील कन्नूरमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते. त्यापैकी केवळ एक ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले आहेत. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, घटना घडलेल्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. या बॉक्समधून अपघात कशामुळे झाला याची माहिती मिळण्याची शक्यता आहे.