नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेची गुणपत्रिका तयार करण्यासाठी बनवलेल्या 13 सदस्यीय सम‍िती आज (17 जून) सुप्रीम कोर्टात आपला अहवाल सादर केला. सीबीएसईने सांगितलं की, अंतिम निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावी गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. सीबीएसईचे निकाल 31 जुलै रोजी जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकालावर आक्षेप असेल त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल, असं अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात सांगितलं.


सीबीएसईने म्हटलं की, दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयातील सर्वाधिक गुण घेतले जातील. तर अशाचप्रकारे अकरावीच्या पाच विषयांची सरासरी घेतली जाईल तसंच बारावीच्या युनिट, टर्म आणि प्रॅक्टिकलचे गुण अंतिम निकाल बनवण्यासाठी घेतले जातील. दहावीचे 30 टक्के, अकरावी 30 टक्के आणि बारावीच्या 40 टक्के गुणांच्या आधारावर अंतिम निकाल बनवला जाईल.


कोरोना संसर्गामुळे सीबीएसई बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. निकाल बनवण्यासाठी 13 सदस्यीय समिती बनवण्यात आली होती. या समितीने निकालाचा फॉर्म्युला आज सुप्रीम कोर्टात सादर केला. तर बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर केले जातील, असं सरकारने कोर्टात सांगितलं.