Dates Of CBSE Board Exams 2021: सीबीएसई बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा चार मे पासून घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी थेट सत्रादरम्यान स्पष्ट केले. परीक्षा 10 जूनपर्यंत चालतील. 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.
शिक्षणमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की ते सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखांची घोषणा 31 डिसेंबर 2020 रोजी म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी करतील. त्यांच्या सूचनेनुसार अखेर शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर केली. यंदाची सीबीएसई बोर्डाची परीक्षा मे ते जून महिन्यादरम्यान होणार आहेत.
परीक्षेच्या तारखांच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिक्षणमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. याआधीही, ते बर्याचदा लाईव्ह आले आहेत आणि प्रत्येक वेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. शेवटी, त्यांनी या कामासाठी वर्षाचा शेवटचा दिवस निश्चित केला.
कोणत्या सत्रात काय विशेष?
जेव्हा शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक प्रथमच लाइव्ह झाले तेव्हा त्यांनी जेईई परीक्षेच्या तारखांना मंजुरी दिली. शेवटच्या वेबिनारच्या वेळीही विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांकडून मोठ्या घोषणांची अपेक्षा होती आणि जेईई 2021 च्या परीक्षेच्या तारखांच्या रुपात हे घडले. इतकेच नव्हे तर वर्षभरात चार वेळा परीक्षा आयोजित करण्यासारखे मोठे निर्णयही घेण्यात आले. परंतु, बोर्ड परीक्षांविषयी काहीही स्पष्ट झाले नव्हते.
दुसऱ्या सत्रातही तारखा स्पष्ट नाही
यानंतर, शिक्षणमंत्र्यांनी आणखी एक थेट सत्र आयोजित केले. या सत्रातही 2021 च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारीपूर्वी घेता येणार नाहीत इतकचं स्पष्ट झालं. हे सेशननंतर शिक्षणमंत्र्यांनी तारखा स्पष्टपणे जाहीर कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी जोरदारपणे केली. अखेरीस त्यांची मागणी ऐकण्यात आली आणि आज बोर्ड परीक्षांच्या तारखा स्पष्ट झाल्या. आता विद्यार्थी त्यांचे स्वतःचे वेळापत्रक तयार करू शकतात आणि उर्वरित अभ्यास किंवा पुनरावृत्तीची आखणी कशी करावी हे ठरवू शकतात. तारखा स्पष्ट करून विद्यार्थ्यांचा ताण बर्याच प्रमाणात कमी होईल.