नवी दिल्ली :  सीबीएसई 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा लवकरचं जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्ड सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी दिली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे  पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. मात्र यावर बोर्ड सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी याबाबतच वेळापत्रक  लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे.






 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा विचार
राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरु झाल्यास दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होते. परंतु आता आपल्या सगळ्यांना परिस्थिती माहित आहे. शक्य असल्यास 23 नोव्हेंबरपासून नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरु करावेत अशी विनंती आम्ही मंत्रिमंडळाला केली आहे. कालच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. ही मुलं मोठी आहे, त्यामुळे सोशल डिस्टन्स, मास्कचे नियम पाळले जातील. संख्या जास्त असेल तर दोन वेळेला बोलवण्यात येईल किंवा दिवसाआड बोलवता येईल. 25 टक्के अभ्यासक्रम कमी केल्याने तसं दडपण कमी आहे. दहावी आणि बारावी हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थी आणि पालकांचं दडपण कमी कसं करता येईल यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत."