CBI Summon: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आधीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे आता दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी गरम होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांची 16 एप्रिल रोजी चौकशी होणार आहे.
सीबीआयच्या समन्सनंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे. अत्याचाराचा अंत नक्कीच होणार असल्याचे ट्वीट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मद्य विक्री धोरण प्रकरणी सीबीआयने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना यापूर्वीच अटक केली आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने त्याला अटक केली होती. त्यावरून आम आदमी पक्ष सातत्याने भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहे.
प्रकरण काय?
2020-21 मध्ये दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने बदल केला होता. काही ठराविक कंत्राटदारांनाच त्यात फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे. संबंधित योग्य त्या विभागाच्या परवानग्या न घेताच लायसन्स फीमध्ये सवलत दिल्याचाही आरोप आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देणारे निर्णय हे केवळ पक्षपातीपणे घेतल्याचा आरोप केजरीवाल यांच्या सरकारवर आहे. या मद्य विक्री धोरणातील घोटाळ्याचा आरोप करत मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली.
दिल्ली सरकारने लागू केलेल्या नव्या मद्य विक्री धोरणातून उत्पन्नात लक्षणीय अशी 27 टक्के महसूल वाढ नोंदवली. त्यामुळे सुमारे 8,900 कोटींचे उत्पन्न दिल्ली सरकारला मिळालं होतं. याच दरम्यान दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला. या धोरणाविरोधात नायब राज्यपालांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरासह 31 ठिकाणी छापे टाकले होते. नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
'आप'चे पाच मंत्री तुरुंगात
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्म घेतलेला पक्ष अशी आम आदमी पक्षाची ओळख आहे. पण गेल्या काही काळांमध्ये आमदार ते मंत्री असे अनेक लोक वेगवेगळ्या आरोपांखाली अटक झाले आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. याआधी सोमनाथ भारती यांच्यावरही घरगुती हिंसाचाराचे आरोप होते. मनीष सिसोदिया हे अटक झालेले आपचे पाचवे मंत्री होते.