नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र  कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नईमधील घरावर सीबीआयने आज सकाळी छापा टाकला. सीबीआयची टीम सकाळी सात वाजता त्यांच्या घरात दाखल झाली होती.

सीबीआयने एकूण 16 ठिकाणी छापा टाकला. मात्र सीबीआयने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही.

INX मीडियाला दिलेल्या मंजुरीबाबत ही छापेमारी करण्यात आली आहे. पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर INX कंपनीला झुकतं माप देऊन लाच घेतल्याचा आरोप आहे.

मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले पीटर मुखर्जी हे INX मीडियाचे प्रमुख आहेत. INX मीडियाशी संबंधित प्रकरणात सोमवारीच गुन्हा दाखल झाला होता.



या प्रकरणात छापा!
हे प्रकरण आयएनएक्स मीडियाशी संबंधित आहे. INX मीडियाच्या निधीला FIPB द्वारे मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी पी. चिदंबरम त्या विभागाचे मंत्री होते.

सीबीआयने या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल केला होता, ज्यात इंद्राणी मुखर्जी, पीट मुखर्जी आणि कार्ती मुखर्जी यांच्या नावाचा समावेश होता.

चेन्नईत पी. चिदंबरम यांच्या घरासह कार्यालयातही सीबीआयने छापा टाकला. सीबीआय दिल्लीतही छापा टाकू शकते असं सांगितलं जात आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात या प्रकरणाचा तपास थांबला होता, जो आता पुन्हा सुरु करण्यात आला.



असे ट्रान्सफर झाले पैसे आणि शेअर
सुत्रांच्या माहितीनुसार, 2008 मध्ये पीटर मुखर्जी यांची कंपनी आयएनएक्स मीडियाने, कार्ती चिदंबरम यांना पैसे दिले होते. त्यांची कंपनी अॅडवान्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांना शेअर दिले होते. आयएनएक्स मीडियाने हफ्त्याने रोख रक्कम दिली होती. या दरम्यान 60 लाख शेअर लंडनमधील आर्टेव्हिया डिजिटल यूके लिमिटेड कंपनीकडून कार्ती चिदंबरम यांच्या कंपनीत ट्रान्सफर करण्यात आले होते.

जप्त हार्डडिस्कमुळे खुलासा
याआदी आयकर विभागाने छाप्यादरम्यान कार्ती चिदंबरम यांच्या कंपनीची हार्डडिस्क जप्त केली होती. आयएनएक्स मीडियाकडून कार्ती यांच्या कंपनीना पैसे मिळाल्याचा खुलासा झाला होता. यासंबंधित कागदपत्रं एफआयपीबीकडे मंजुरीसाठी आले, त्यादरम्यान पी चिदंबरम अर्थमंत्री होते, असंही यातून समोर आलं.