CBI आणि ED नीरव मोदी-मेहुल चोक्सीकडून पैसा कसा वसूल करणार?
एबीपी माझा वेब टीम | 21 Feb 2018 09:20 AM (IST)
नीरव मोदीच्या धमकीनंतर आता साडे अकरा हजार कोटींची वसुली होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
नवी दिल्ली : नीरव मोदीच्या कर्ज परत न करण्याच्या धमकीनंतर तपास यंत्रणांनी त्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची यादी बनवणं सुरु केलं आहे. लवकरच ही संपत्ती जप्त करण्याचीही तयारी केली आहे. मात्र नीरव मोदीच्या धमकीनंतर आता साडे अकरा हजार कोटींची वसुली होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पीएनबीने आपल्या कंपन्यांवर असलेलं कर्ज वाढवून सांगितलं असल्याचा दावा नीरव मोदीने केला आहे. पीएनबीला 15-16 फेब्रुवारीला नीरव मोदीकडून पत्र लिहिण्यात आलं. ज्यात, आपल्या कंपन्यांवर पीएनबीचं कर्ज 5 हजार कोटींपेक्षा कमी आहे, असाही दावा नीरव मोदीने केला आहे. 'पीटीआय'ने नीरव मोदीच्या पत्राबाबत वृत्त दिलं आहे. ''चुकीच्या पद्धतीने कर्जाची आकडेवारी सांगितल्यामुळे माध्यमांमध्ये हे प्रकरण गेलं आणि चौकशी सुरु झाली. परिणामी कामही बंद झालं. प्रकरण सार्वजनिक झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता बँकेचं कर्ज चुकतं करण्याची आमची क्षमताही धोक्यात आली आहे,'' असं नीरव मोदीने म्हटलं आहे.