मुंबई : एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्यावर सध्या असलेले निर्बंध या आठवड्यात मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊने याबाबतचं वृत्त दिलंय. नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या नोटाटंचाईनंतर बँकेतून पैसे काढण्यावर रिझर्व बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, सध्या करंट म्हणजेच चालू खात्यातून आठवड्याला 50 हजार रुपये तर सेव्हिंग म्हणजे बचत खात्यातून आठवड्याला 24 हजार रुपये काढता येतात.

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा यापूर्वीच वाढवण्यात आली आहे. अगदी सुरवातीच्या काळात दररोज फक्त 2000 रुपयांची असलेली मर्यादा अडीच हजार आणि त्यानंतर साडेचार हजार रुपये करण्यात आली.

रिझर्व बँकेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेचा फेरविचार होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, सध्या असलेली मर्यादा पूर्णपणे उठवली जाईल की अंशतः वाढवली जाईल, हे मात्र निश्चित झालेलं नाही.

सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, बचत खात्यावरून पैसे काढण्यासाठी सध्या असलेली 24 हजार रुपयांची मर्यादा 35 हजारांपर्यंत वाढवली जाऊ शकते. चालू खात्यातून पैसे काढण्याची मर्यादाही त्याप्रमाणात वाढवली जाण्याची शक्यता आहे.

चालू खाते ही प्रामुख्याने व्यावसायिक किंवा व्यापाऱ्यांची असतात.

सध्या बऱ्याच एटीएममध्ये पैसे असतात, शिवाय त्याबाहेरील रांगाही मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. बँकांमधील रोकडस्थितीही मोठ्या प्रमाणावर सुधारल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या आठवड्यात बँकेतून पैसे काढण्यावर असलेले निर्बंध मागे घेतले जाण्याची किंवा अंशतः शिथील होण्याची शक्यता आहे.