मुंबई :ऑनलाईन एंटरटेनमेंट चॅनेल 'द व्हायरल फीवर' (TVF) चे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार याच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी रात्री मुंबईच्या एमआयडीसी पोलीस स्थानकात एका पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 2016 मधील असून, त्यावेळी पीडित तरुणी TVF च्या ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी गेली होती. यावेळी अरुणाभ यांनी तिच्याशी अश्लिल चाळे केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली आहे.

काही दिवसांपूर्वी TVF चॅनेलच्या एका माजी कर्मचारीनेही ब्लॉगच्या माध्यमातून अरुणाभवर दहा वर्षे लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. हा ब्लॉग व्हायरल झाल्यानंतर इतर काही पीडित तरुणींनीही आरुणाभच्या बाबतीत अनेक खुलासे केले.

आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत अरुणाभ यांनी त्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, तसेच याप्रकरणी निष्पक्ष न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत अरुणाभने केली होती.

दरम्यान, अरुणाभ विरोधातील लैगिंक शोषणाच्या आरोपांनी सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला होता. त्यातच आता त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा नोंद झाल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे.