नवी दिल्ली : एकीकडे मंत्रिपद मिळाल्याचा आनंद तर दुसरीकडे मतदारसंघात जाता येत नसल्याची घालमेल...दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या या गोष्टीची जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक जणांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी तर मिळाली पण हा आनंद साजरा करण्यासाठी मतदारसंघात जाण्याची संधी मात्र नव्या मंत्र्यांना मिळत नाही.


15 ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका असा आदेश नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोदींनी दिला होता. त्यामुळे इच्छा असूनही अनेक मंत्री मतदार संघातले स्वागत सत्कार समारंभ करू शकत नाहीत. एरव्ही सोमवार ते शुक्रवार दिल्लीतली कामे सांभाळल्यानंतर सहसा शनिवार रविवार साठी मंत्री आपल्या मतदारसंघात येत असतात.अगदी संसदेचे अधिवेशन सुरू असलं तरी अनेक मंत्री,खासदारांचं हेच वेळापत्रक असतं. पण मोदींनी दिलेल्या आदेशानंतर मात्र कुठल्याच मंत्र्याचं सध्या मतदारसंघाकडे पाऊल टाकण्याचे धाडस होत नाही.


खंरतर अनेक नव्या मंत्र्यांना अजून पूर्णपणे अधिकाऱ्यांची नवी टीम मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात ही झाली नाही मात्र तरीदेखील शनिवार-रविवार हे मंत्री दिल्लीत बसूनच होते. त्यात पुढच्या सोमवारीच संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने त्याआधी मतदार संघात जाण्याची संधी मिळेल असं वाटत नाही. नव्या मंत्र्यांचं मतदारसंघातले सेलिब्रेशन चांगलंच लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शनिवार रविवारी सुद्धा दिल्लीत बसून असलेले मंत्री हे एरवी दुर्मिळ वाटणारं चित्र मात्र त्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. काही नेते एकमेकांना फोन करून आपण मतदार संघात जाऊ शकतो का याची चाचपणी करत आहेत तर काहींनी आपल्या मतदार संघातल्या आमदार कार्यकर्त्यांनाच दिल्लीत बोलावून घेतलं आहे त्यामुळे अभिनंदनासाठी या सगळ्यांची नव्या मंत्रालयांमध्ये रीघ लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता खरोखर 15 ऑगस्टपर्यंत हे सगळे नेते दिल्लीत थांबणार की त्याआधी त्यांची सुटका होते हे पाहावं लागेल. सध्या कोरोना संकट असल्यामुळे नव्या मंत्र्यांचं मतदारसंघातलं सेलिब्रेशन चांगलं दिसणार नाही या हेतूने देखील मोदींनी हा आदेश दिल्याचे कळत आहे.


संबंधित बातम्या :