मुंबई : संसदेत विविध मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिल्यानंतर, पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन केलेल्या एका ट्वीटची सध्या जोरदार चर्चा आहे. या ट्वीटमध्ये मोदी स्वत:वरच आरोप करत असल्याचं वाटत असलं तरी हे उपहासात्मक ट्वीट आहे.

"काँग्रेसने कलम 356 चा अनेक वेळा गैरवापर केला आहे. मात्र मोदींनी संस्था नष्ट केल्या : पीएम," असं ट्वीट काल संध्याकाळी पीएमओ इंडिया या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलं. या ट्वीटची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा असून अनेकांनी त्यावर उपहासात्मक कॉमेंट्सही केल्या आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या पीएमओ ट्विटर अकाऊंटवरुनही अनेक वेळा कामांची माहिती दिली जाते. मात्र कालचं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. शिवाय मोदी विरोधक हे ट्वीट मोठ्या प्रमाणात वायरल करत आहेत.

मागील काही दिवसांपासून मोदी सरकारने देशातील सीबीआय, ईडी, न्यायव्यवस्था यांसारख्या प्रमुख संस्था मोडीत काढल्याचा आरोप नेहमी विरोधकांकडून होत असतो. अशात पीएम ऑफिसच्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी संस्था नष्ट केल्या, असं स्वत: नरेंद्र मोदी म्हणत असल्याचं ट्वीट शेअर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या ट्वीटनंतर अनेकांनी नरेंद्र मोदी पहिल्यांदाच खरं बोलत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी पाच वर्षात पहिल्यांदा खर बोलले आहेत, त्यांचं स्वागत करायला हवं, अशी रिप्लाय एका केला. तर एका युझरने राहुल गांधी तर हे ट्वीट करत नाहीत ना, अशी उपाहासात्मक कॉमेंट केली.

दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनीही या ट्वीटवर प्रश्नचिन्ह लिहून नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे.

मोदी महत्त्वाच्या संस्था नष्ट करत आहेत, असा आरोप करणाऱ्या काँग्रेसला उत्तर देताना, मोदींच्या भाषणातील काही मुद्दे पीएमओच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. त्यापैकी काही ट्वीट असेच उपहात्मक आहेत.