सूरत : गुजरातमध्ये पाच दिवसात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र यापूर्वी सूरतमधील सभेत पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने खळबळजनक दावा केला. सूरतमध्ये रॅली न काढण्यासाठी एका व्यापाऱ्याने आपल्याला पाच कोटींची ऑफर दिली, असा दावा हार्दिक पटेलने केला.

सूरतमध्ये रॅलीनंतर झालेल्या सभेत हार्दिक पटेलने हा खुलासा केला. फोनवर सूरतमध्ये न येण्याची किंमत विचारण्यात आली, असं तो म्हणाला. हार्दिक पटेलच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र एका व्यापाऱ्याचा फोन आला होता, असं म्हणत हार्दिक पटेलने त्या व्यापाऱ्याचं नाव सांगणं टाळलं.

या दाव्यानंतर गुजरातच्या राजकारणात आता नवा ट्वीस्ट आला आहे. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील वाद ताजा असतानाच हार्दिक पटेलने हा दावा केला आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर सुरु झालेलं गुजरातचं राजकारण पैशांच्या बळावर सुरु आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान हार्दिक पटेलने हा दावा करुनही त्या व्यापाऱ्याचं नाव का सांगितलं नाही, असा सवालही विचारला जात आहे. हार्दिक पटेलच्या या दाव्यामागे राजकीय रणनिती आहे का? किंवा प्रसिद्धीसाठी हे वक्तव्य केलं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.