नवी दिल्ली: देशातल्या 55 कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे त्यापेक्षा जास्त संपत्ती ही अदानी आणि अंबानींकडे आहे, देशातील उद्योगांमध्ये एकाधिकारशाही तयार होऊन ते सर्व अदानी-अंबानींच्या हाती देण्याचं काम मोदी सरकारने केलं असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर बोलताना करताना केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. 


राहुल गांधी म्हणाले की, "देशात दोन भारत तयार करण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. एक भारत असा आहे जो खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना पाणी, वीज यासारख्या समस्या पडत नाहीत. दुसरा भारत असा आहे की गरीब पिचलेल्या लोकांचा भारत आहे. या दोन भारतामधील दरी वाढत आहे. रेल्वेच्या नोकरीसाठी बिहारमध्ये युवकांनी आंदोलन केलं. भारतातील युवक हे सरकारकडून रोजगार मागत आहेत पण सरकार त्यांना ते देण्यास सक्षम नाही. पण केंद्र सरकारने बेरोजगारांच्या मुद्द्यावर एकही शब्द काढला नाही."
 
सन 2020 मध्ये देशातील तीन कोटी युवकांनी आपला रोजगार गमावला. गेल्या 50 वर्षातील ही आकडेवारी सर्वात मोठी आहे असंही राहुल गांधी यांनी सांगितलं. 


टीका केल्यावर केंद्र सरकारला ती सहन का होत नाही असा सवाल राहुल गांधींनी विचारला. राहुल गांधी म्हणाले की, गेल्या सात वर्षामध्ये असंघटित क्षेत्रातील आणि लघु उद्योगातील अनेक रोजगार बुडाले. नोटबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी झाली. परिणामी देशाचं नुकसान झालं. त्यामुळे 84 टक्के भारतीयांच्या उत्पन्नावर परिणाम झाला, ते अधिक गरीब झाले. 


देशातील उद्योग अदानी-अंबांनींच्या हातात
राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने उद्योग क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण केली आहे. कोरोना काळात जसं कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट आले तसा दोन उद्योगपतींचा व्हेरियंट आला आहे आणि त्यांच्या हातात देशातील सर्व उद्योग देण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. एका व्यक्तीकडे खनिजं, तेल, वीज असं जे काही आहे नाही ते दिलं तर दुसऱ्या व्यक्तीकडे पेट्रोकेमिकल, ई-कॉमर्स, टेलिकॉम असे उद्योग दुसऱ्याकडे देण्यात आले. हे दोन उद्योगपती म्हणजे अदानी आणि अंबानी आहेत."


युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात आम्ही 27 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढलं, तुम्ही 23 कोटी लोकांना पुन्हा दारिद्र्य रेषेत ढकललं असा आरोपही राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केला आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha