बसप खासदाराच्या सूनेची गोळी झाडून आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2016 03:34 PM (IST)
गाझियाबाद : बसपचे राज्यसभा खासदार नरेंद्र कश्यप यांच्या सूनबाईंचा मृतदेह बुधवारी संशयास्पद अवस्थेत आढळला. हिमांशी कश्यप यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचा अंदाज असला तरी प्रकरणाचं गूढ कायम आहे. कश्यप यांच्या उत्तर प्रदेशातील संजय नगर परिसरातल्या राहत्या घरी सून हिमांशी यांचा मृतदेह आढळला. घरातील बाथरुममध्ये 29 वर्षीय हिमांशी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं. हिमांशी यांनी आत्महत्या केल्याचा दावा पती डॉक्टर सागर कश्यप यांनी केला आहे, तर त्यांची हत्या झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. सुसाईड नोट सापडली नसल्यामुळे पोलिस सध्या दोन्ही शक्यता पडताळून पाहत आहेत. हिमांशी या बसपचे माजी मंत्री हिरालाल कश्यप यांच्या कन्या होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांचं सागरशी लग्न झालं असून त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचं प्रकरण वाटत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून अधिक तपास सुरु आहे.