अलाहाबाद : उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये बसपा नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांचा अद्याप तपास लागलेला नाही, तसंच हत्येचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे.


बसपा नेते मोहम्मद शमी घराकडे जात असताना अज्ञांतांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अलाहाबाद शहरापासून 50 किमी अंतरावर मऊआइमा भागातील ही घटना आहे.

मोहम्मद शमी यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 20 वर्षे समाजवादी पक्षात राहिल्यानंतर मोहम्मद शमी यांनी बसपामध्ये प्रवेश केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार शमी यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा तपास सरु आहे. काही संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली.