जम्मू : जम्मू काश्मीरमधील जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफ जवान नरेंद्र सिंह यांची निर्घृण हत्या केल्यानंतर देशात तणावाचं वातावरण आहे. दुसरीकडे विरोधकांनी जवानांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार सैन्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने जवानांवरील हल्ल्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत आहेत.


जवानाची गळा चिरुन, गोळ्या झाडून हत्या
जम्मूजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर रामगड सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफ जवान नरेंद्र सिंह यांचं अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या केली. पाक रेंजर्सनी आधी नरेंद्र सिंह यांचा गळा चिरला आणि नंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. इतकंच नाहीतर तर त्यांच्या मृतदेहाचीही विटंबना केली. जवान नरेंद्र सिंह यांचा मृतदेह मंगळवारी (19 सप्टेंबर) सापडला. नरेंद्र सिंह हे हरियाणाच्या सोनीपतमधील कला गावचे रहिवासी होते. आज त्यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला होता. या घटनेनंतर सुरक्षा दलाने 192 किमी आंतरराष्ट्रीय सीमा आणि 740 किमी नियंत्रण रेषेवर हायअलर्ट जारी केला आहे.


सरकारने कारवाई करावी : कुटुंबीय
वडील शहीद झाल्याने दु:खात बुडालेल्या कुटुंबियांना पाकिस्तानच्या नापाक हरकतीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "आमच्यासाठी हा अभिमानाचा विषय आहे. प्रत्येकाला तिरंग्यात अखेरचा निरोप मिळत नाही. पण आम्ही फक्त अभिमान बाळगून शांत राहणार नाही. आम्हाला आज अभिमान आहे, उद्या आणखी कोणी शहीद होईल आणि पुन्हा अभिमान वाटेल. पण सरकारने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे," असं नरेंद्र सिंह यांचा मुलगा म्हणाला.


तसंच सैनिकांविषयी सरकारच्या भूमिकेवरही कुटुंबियांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. "आज आम्हाला अभिमान आहे. पण दोन ते तीन दिवसांनंतर काय होणार, जेव्हा आम्हाला कोणतीही मदत मिळणार नाही? मी आणि माझा भाऊ बेरोजगार आहोत. माझे वडील हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. कुटुंबाचे आधार होते. देशसेवा करताना त्यांना वीरमरण आलं. ज्या गोष्टींची आम्हाला गरज आहे, त्या प्रशासनाने द्याव्यात," असंही नरेंद्र सिंह यांचा मुलगा म्हणाला.

राजकीय फायद्यासाठी सैन्याचा वापर
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, "आधी हेमराज, आता नरेंद्र सिंह. पाकिस्तानने त्यांची निर्घृणपणे हत्या केली. सरकार काय करत आहे. मोदीजी तुमचं मन तुम्हाला खात नाही? 56 इंचाची छाती कुठे गेली आणि कुठे गेले लाल डोळे? एकाच्या मोबदल्यात 10 शीर आणण्याचं आश्वासन कुठे विरलं? सरकारला जवानांची काळजी नाही. मोदी आपल्या सैन्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करत आहेत, पण त्यांच्या सुरक्षेचा विचार करत नाहीत. देशाला उत्तर हवं आहे आणि तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल."