लखनऊ : एखाद्या मुद्द्यावर मतभेद झाल्यास त्याचा निष्कर्ष काय काढावा, यावर बऱ्याचदा तरुण पिढी संभ्रमावस्थेत दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मतभेद झाल्याने लग्न मोडल्याचा आश्चर्यकारक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे.


सोशल मीडियावर ज्याप्रकारे तरुणवर्ग मतं नोंदवताना दिसतो, त्यावरुन तरुणाईने राजकारणाला जास्तच गांभीर्याने घेतल्याचं पाहायला मिळतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी विचारधारा न जुळल्याने उत्तर प्रदेशात एका जोडप्याने ठरलेलं लग्नच मोडलं. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील व्यावसायिक तरुण सरकारी सेवेत असलेल्या तरुणीशी विवाहबद्ध होणार होता. दोघं जण यूपीतील कोणत्या भागात राहतात किंवा त्यांची नावं, याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे.

लग्नाची बोलणी करण्यासाठी दोघं जण देवळात भेटले होते. त्यावेळी एकाने देशातील आर्थिक अधोगतीचा मुद्दा उपस्थित केला. या घसरणीला मोदीच जबाबदार असल्याचा दावा तरुणीने केला, तर मोदी समर्थक असलेल्या तरुणाने तिचा कडाडून विरोध केला. वाद वाढत गेला आणि दोघांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.

मुलांच्या निर्णयामुळे पालकांना मोठा धक्का बसला. मात्र दोघंही जण आपल्या निर्धारावर ठाम होते. बिभत्स नागीण डान्स, तंबाखूचं व्यसन, सोपं गणित सोडवता न येणं, घरात स्वच्छतागृह नसणं यासारख्या चित्रविचित्र कारणांमुळे लग्न मोडल्याच्या घटनांमध्ये आणखी एकाची भर पडली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.