13th BRICS Summit : आजपासून ब्रिक्स (BRICS) देशांच्या वार्षिक बैठकीला सुरुवात होणार आहे. ब्रिक्स देशांच्या आजच्या बैठकीत प्रामुख्याने अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या बैठकीचे अध्यक्षपद हे भारताकडे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीत भाग घेणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्रपती शी झिनपिंग, रशियाचे पुतिन, ब्राझिलचे बोलसोनारो आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामाफोसो हे सामिल होणार आहेत. 


भारतीय पंतप्रधानांच्या निमंत्रणावरुन चीनचे राष्ट्रपती शी झिनपिंग हे या परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाग घेणार आहेत असं चीनच्या परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलं आहे. या वर्षी ब्रिक्स परिषदेची थीम ही "Intra-BRICS cooperation for continuity, consolidation and consensus" अशी आहे. 


 






या वर्षीच्या ब्रिक्स परिषदेमध्ये अफगाणिस्तान आणि जागतिक दहशतवादाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आणला जाणार असल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त डिजिटल टेक्नॉलॉजी, ब्रिक्स देशांतील व्यापार आणि इतर प्रकारचे व्यवहार हेही मुद्दे चर्चेत येणार आहेत. ब्रिक्स देशांतील लोकांमध्ये आपापसातील संबंध वाढवण्यावरही या देशांचा भर असणार आहे. तसेच या देशांतील कोरोनाच्या स्थितीवर आणि त्यावरील उपायांवरही चर्चा केली जाणार आहे. 


ब्रिक्स ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समूह आहे. ब्रिक्स देशांमध्ये जगातील 42 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या राहते. आणि हा समूह जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. गेल्या वर्षीची परिषद ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. 


महत्वाच्या बातम्या :