नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अशोक विहार भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रेकअप झाल्यानंतर संतापलेल्या मुलाने मुलीच्या घरात घुसून तिच्यावर गोळी झाडली. या 30 वर्षीय तरुणाला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.


या घटनेत संबंधित मुलगी जखमी झाली असून सध्या आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. हरीश असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. हरीश या मुलीच्या शेजारीच राहतो. दोघांची चांगली ओळख आहे.

संबंधित मुलगी चार्टर्ड अकाऊंटंट आहे. हरीश तिच्या गुडगावच्या ऑफिसपर्यंत पाठलाग करायचा. दोघे पाच वर्ष रिलेशनशीपमध्ये होते, असंही बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच या मुलीचा साखरपुडा एका दुसऱ्या मुलासोबत झाला होता. तेव्हापासूनच अस्वस्थ असलेला हरीश सारखा गोळी घालण्याची धमकी देत होता.

दरम्यान, मुलीच्या घराबाहेरील दृष्य सीसीटीव्हीत कैद झालंय, ज्यात हा तरुण घरातून बाहेर पडताना दिसतोय. मुलीच्या कुटुंबीयांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. शिवाय पत्रकारांनाही रोखण्यात आलं. सध्या भारत नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे.