अमृतसरमधील निरंकारी भवनावर बॉम्ब हल्ला, तिघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 18 Nov 2018 01:54 PM (IST)
अमृतसरमधील निरंकारी भवनावर अज्ञातांनी बॉम्ब हल्ला केला, त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.
अमृतसर : आज दुपारी 12 च्या सुमारास पंजाबमधील अमृतसरजवळच्या राजासांसी गावामधल्या निरंकारी भवनावर अज्ञातांनी बॉम्ब हल्ला केला. दुचाकीवर स्वार काही अज्ञात लोक निरंकारी भवनाजवळ आले व त्यांनी त्यांच्याकडचे ग्रेनेड निरंकारी भवनाच्या आत फेकले. ग्रेनेडच्या स्फोटांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पंजाबचे पोलीस महासंचालक सुरिंदर पाल सिंह परमार यांनी सांगितले की, "अमृतसरमध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे पंजाबसह दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे." या घटनेमुळे अमृतसरमध्ये अफवा पसरल्या आहेत. लोकांनी अफवांकडे लक्ष न देण्याचे आवाहन पंजाब पोलिसांनी केले आहे. तसेच पोलिसांनी राजस्थानशी जोडलेल्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली आहे.