नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापलं आहे. भाजप आणि काँग्रेसकडून निवडणूक प्रचारासाठी चांगला जोर लावला जात आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची धुरा पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या खांद्यावर आहे.

तर दुसरीकडे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक सभा घेत आहेत. दोन्ही पक्षांनी याबाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड सेलिब्रेटिंसह अनेक टीव्ही स्टार उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बॉलिवूडचे दिग्गज मैदानात

अधिक माहितीनुसार, बॉलिवूडचा दंबग खान सलमान भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे. सलमान खान आणि पंतप्रधान मोदींमधील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत. गुजरात महोत्सवात सलमान खान पंतप्रधान मोदींसोबत पतंगबाजी करताना दिसला होता. त्यामुळे तो भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



याच यादीत अक्षय कुमारच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान मोदींनी अक्षयच्या राष्ट्रभक्तीचं भरभरुन कौतुक केलं आहे. अक्षयनेही पंतप्रधान मोदींच्या महत्त्वकांक्षी स्वच्छ भारत अभियानात उत्सफूर्तपणे सहभाग घेतला. त्यामुळे तो देखील भाजप उमेदवारांचा प्रचार करताना दिसेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.



या यादीत तिसऱ्या क्रमांकावर परेश रावल यांच्या नावाचा समावेश आहे. वास्तविक, परेश रावल सध्या भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे ते भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी सभा घेत आहेत.

याशिवाय अनुपम खेर यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. काश्मिरी पंडितांच्या समस्या, दहशतवाद आदी विषयांवर अनुपम खेर आपली रोखठोक मतं मांडतात. त्यांची ही मतं चाहत्यांमध्ये सर्वाधिक पसंतीची आहेत. त्यामुळे ते भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्यास, त्याचा नक्कीच फायदा पक्षाला होईल, अशी चर्चा सुरु आहे.

तसेच अजय देवगनदेखील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजय देवगन भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्यास पक्षाला चांगला फायदा होईल.

याशिवाय खासदार हेमा मालिनी या देखील भाजप उमेदवारांचा प्रचार करतील. तसेच मनोज तिवारी हे देखील भाजपच्या प्रचार कँम्पेनसाठी सध्या गुजरातमध्ये आहेत. ज्या भागात उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मतदारांचं प्रमाण जास्त आहे, त्या भागात मनोज तिवारींच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत .

काँग्रेसकडूनही दिग्गज सेलिब्रिटी मैदानात

दुसरीकडे काँग्रेसनेही अनेक दिग्गज सेलिब्रिटींना प्रचाराच्या मैदानात उतरवलं आहे. काँग्रेसकडून राज बब्बर गुजरातमध्ये प्रचार करु शकतात. सध्या ते उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. पण लवकरच ते गुजरात विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचार करताना दिसतील.



याशिवाय, नगमा, रितेश देशमुख, नवज्योत सिंह सिद्धू, महिमा चौधरी आदी सेलिब्रिटी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करतील.