BMC Worker Story : शिक्षण घेण्यासाठी वय आणि कालमर्यादा नसते, असे म्हणतात. शुक्रवारी राज्यात दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मात्र, यंदा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले 50 वर्षीय कुंचीकोर्वे मशन्ना रामाप्पा चर्चेचा विषय ठरले आहेत. 


कुंचीकोर्वे मशन्ना यांनी त्यांच्या मेहनतीने दहावी बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात 57.40 टक्के मिळवून उत्तीर्ण केली आहे. मशन्ना सांगतात की, 1989 मध्ये त्यांना बीएमसीच्या सीवरेज विभागात त्यांना नोकरी मिळाली. ज्या वेळी त्यांना बीएमसीमध्ये नोकरी मिळाली तेव्हा मशन्ना फक्त चौथी पास होते. मशन्नाच्या पगारात दरवर्षी किरकोळ वाढ होत असते. कारण ते चौथीपर्यंतच शिकले होते. कमी शैक्षणिक पात्रतेमुळे पदोन्नतीही थांबवण्यात आली होती. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मशन्नाने आपल्या मुलांपासून प्रेरित होऊन दहावीची बोर्डाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांना 57.40 टक्के गुण मिळाले. 


तीन वर्षांपूर्वी, मशन्नाने त्यांचा रखडलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईतील नाईट स्कूलमध्ये आठवीच्या वर्गात प्रवेश घेतला. आणि त्यानंतर सलग तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. मशन्ना सांगतात की, ते आता 10वी उत्तीर्ण झाल्यामुळे खूप आनंदी आहेत. मात्र, आता ते केवळ दहावी उत्तीर्ण झाल्यावरच थांबणार नाहीत तर पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण करणार आहेत. या यशाबद्दल मशन्ना यांनी त्यांची तीन मुले, पत्नी आणि बीएमसीमधील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. 


महत्वाच्या बातम्या :