मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांच्या कुटुंबीयांना एका वैज्ञानिकाने 110 कोटी रुपयांची मदत देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला ई-मेल पाठवून नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. पीएमओने उत्तरात मुर्तजा यांना आपली प्रोफाईल पाठवायला सांगितलं आहे. तसंच दोन ते तीन दिवसात भेट निश्चित करु असं आश्वासनही दिलं आहे.

मुर्तजा अली हमीद असं या वैज्ञानिकाचं नाव असून ते नेत्रहीन आहेत. 44 वर्षीय मुर्तजा यांचं सध्याचं वास्तव्य मुंबईत असून ते मूळचे राजस्थानच्या कोटामधील आहेत. मुर्तजा अली आपल्या उत्पन्नातून 110 कोटी रुपयांची रक्कम देणार आहेत.

मुर्तजा हमीद यांनी एका गोष्टीसाठी सरकारवर नाराज आहेत. जर सरकारने माझ्या एका संशोधना वेळीच मान्यता दिली असती तर पुलवामा हल्ला झालाच नसता. मुर्तजाने 'फ्यूएल बर्न रेडिएशन टेक्नॉलॉजी'चा शोध लावला होता. या तंत्राच्या मदतीने ज्या गाड्यांमध्ये जीपीएस, कॅमेरा आणि इतर तांत्रिक उपकरणं नाही, त्याचाही शोध लावला जाऊ शकतो.

मुर्तजा यांनी 2016 मध्ये हे तंत्र भारत सरकारला मोफत देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण सरकारकडून ऑक्टोबर 2018 मध्ये याला मंजुरी मिळाली.

40 जवान शहीद आणि एअर स्ट्राईक
14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतीय वायूदलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करुन जैश-ए-मोहम्मदचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते.