मुंबई : भाजपची मंगळवारी हॅक झालेली वेबसाईट (http://www.bjp.org/)तब्बल तीन दिवसानंतरही रिस्टोअर झालेली नाही. भाजपसारख्या राष्ट्रीय आणि सत्ताधारी पक्षाला वेबसाईट रिस्टोअर करण्यासाठी तीन दिवस लागावेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


भाजपची अधिकृत वेबसाईट 5 मार्च रोजी हॅक झाली होती. त्यानंतर आज तीन दिवस झाले तरी वेबसाईट सुरु झाली नसल्याने भाजपसारख्या डिजीटल फ्रेंडली पक्षाला आपली हॅक झालेली वेबसाईट रिस्टोअर करण्यासाठी तीन दिवस लागावेत का? असा सवाल अल्ट न्यूजचे संपादक प्रतिक सिन्हा यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर तशी पोस्ट केली आहे.


वेबसाईट हॅक करुन त्यावर आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सेलल अँजेला मर्केल यांचा एक व्हिडीओ साईटवर दिसत होता. सोबतच व्हिडीओच्या वर आक्षेपार्ह मजकूरही लिहिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांनीही याबाबत ट्वीट केलं होतं. "भाईयो और बहनों, जर तुम्ही आता भाजपची वेबसाईट पाहत नसाल तर तुम्ही बरंच काही मिस कराल."

नंतर वेबसाईट सुरुच होत नव्हती आणि एरर येऊ लागला. बराच वेळ हा एरर कायम होता. 26 डिसेंबर, 1995 रोजी या वेबसाईटची नोंदणी झाली होती. तसंच भाजपची वेबसाईट 10 ऑक्टोबर, 2018 पासून अपडेटच झालेली नसल्याच समोर आलं. तर याआधी 20 फेब्रुवारीला छत्तीसगड भाजपची वेबसाईटही हॅक झाली होती.

सध्या तीन दिवसांपासून भाजपची वेबसाईट ओपन केल्यास 'We'll be Back Soon!' असा संदेश होमपेजवर दाखवत आहे.