नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अद्याप स्थिर आहे. त्यांना मूत्रसंसर्ग झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


अधिक उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात ठेवावे लागणार आहे. त्यांच्यावर उपचार झाले असून सध्या त्यांना वैद्यकीय निरिक्षणाखाली एम्समध्येच ठेवण्यात आलं आहे.

सध्या वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देशभरात होम-हवन केले जात आहेत.


मेडिकल बुलेटीन

वाजपेयींच्या प्रकृतीबाबत ‘एम्स’कडून मेडिकल बुलेटीन जारी करण्यात येतं. काल रात्रीच्या मेडिकल बुलेटीननुसार, वाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर औषधांचा सकारात्मक परिणाम होत आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. जोपर्यंत संसर्ग दूर होत नाही, तोपर्यंत ते रुग्णालयातच राहतील, असं डॉक्टरांनी सांगितलं.

मूत्रसंसर्ग आणि किडनी विकार

वाजपेयींना मूत्रसंसर्ग आणि किडनी विकाराचा त्रास आहे. ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

93 वर्षीय वाजपेयी हे सध्या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असतात.

भेटीसाठी दिग्गज 'एम्स'मध्ये

वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, त्यांच्या प्रकृतीच्या विचारणेसाठी दिग्गजांची एम्समध्ये रांग लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एम्स’मध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मोदींच्या अगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

याशिवाय मंगळवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मोदी जवळपास 55 मिनिटे रुग्णालयात होते. त्यानंतर लगेच राजनाथ सिंह आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही रुग्णालयात येऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 2009 सालापासून आजारी असून त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराने ते ग्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते कोणत्याही सभेत किंवा भाजपच्या कार्यक्रमात दिसलेले नाहीत.

संबंधित बातम्या 

अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल

राहुल गांधी ते मोदी, वाजपेयींना भेटण्यासाठी दिग्गज 'एम्स'मध्ये 

अटल बिहारी वाजपेयींना मूत्रसंसर्ग, सध्या प्रकृती स्थिर : AIIMS