Bihar Politics : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला धक्का देत राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा केला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजप आणि जनता दल या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. दरम्यान, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी पुन्हा जनता दलावर निशाणा साधला आहे. लालूप्रसाद यादव यांना वाटेल तेव्हा ते त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवतील असे मोदींनी म्हटलं आहे. सुशील कुमार मोदींनी यामागची कारणे देखील सांगितली आहेत. सध्या जेडीयूचे काउंटडाऊन सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलंय.


सुशील कुमार मोदी यांनी ट्वीट करत जनता दलावर निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी जनता दलाची उलटी गिनती सुरू झाली असल्याचे म्हटलं आहे. लालू प्रसाद यादव यांना वाटेल तेव्हा ते नितीश कुमारांना हटवून त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करतील. ज्या पक्षाला 115 आमदारांचा पाठिंबा आहे आणि सभापती देखील त्याच पक्षाचे आहेत. त्यामुळं ते कधीही बदलू शकतात असेही मोदींनी म्हटलं आहे.


महागठबंधनचे गणित नेमकं काय आहे


भाजप नेते विजयकुमार सिन्हा यांनी बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते अवध बिहारी चौधरी नवे सभापती बनले आहेत. त्यांनी गुरुवारी शपथ घेतली. आता विधानसभेचे अध्यक्ष राष्ट्रीय जनता दलाचे आहेत. तसेच महाआघाडीतील 164 आमदारांपैकी जनता दलाचे  43 आमदार आहेत. अशा स्थितीत तेजस्वी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. महाआघाडीतील 164 आमदारांपैकी नितीश कुमार यांचे 43 आमदार कमी झाले तर एकूण 121 राहतात. बिहारमध्ये बहुमतासाठी 122 आमदारांची गरज आहे. त्यामुळं लालूप्रसाद यादव हे तेजस्वी यादव यांनी कधीही मुख्यमंत्री बनवू शकतात असं मोदींनी म्हटलं आहे. 


दरम्यान, सुशील मोदींच्या या वक्तव्यावर आतापर्यंत जनता दल किंवा राष्ट्रीय जनता दल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सुशील मोदींनी नितीश कुमार यांच्यासोबत दीर्घकाळ काम केले आहे. पण जनता दलानं भाजपपासून फारकत घेतल्यानंतर सुशीलकुमार मोदी त्यांच्यावर सतत हल्लाबोल करत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: