नवी दिल्ली: तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातनची (Santan Dharm) तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. त्यावर भाजपकडून वारंवार इंडिया आघाडीला सवाल केले जातायंत. स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी का बोलत नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केलाय. तर राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पुन्हा गोध्राकांड होईल, या उद्धव ठाकरेंच्याही वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतलाय.


जी 20 शिखर परिषद संपली आणि पुन्हा एकदा देशातली राजकीय लढाई या मुद्द्यावर येऊन ठेपली आहे.  डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्यानं या वादाला सुरुवात झाली होती. इंडिया आघाडीनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. सोनिया गांधी यावर मौन धारण करुन का आहेत? असं म्हणत भाजपनं जोरदार टीका केलीय. याला निमित्त तामिळनाडूच्या शिक्षणमंत्र्यांचं ताजं वक्तव्य ठरलं. इंडिया आघाडीचा जन्म सनातन संपवण्यासाठीच झाला आहे असं त्यांनी म्हटलं त्यावर भाजपनं हा पलटवार केलाय.


सनातन धर्माचा हा वाद  उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका वक्तव्यानं सुरु झाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे ते पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी तुलना केली. त्यामुळे स्टॅलिन यांच्यावर टीका झाली. पण त्यानंतरही हा धर्म सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे या आपल्या तर्कावर ते ठाम राहिले. त्यासाठी त्यांनी दुसऱ्याच दिवशी लगेच उदाहरणही दिलं. 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या उद्गाटनाला न बोलावणं हे सनातन धर्माच्या सामाजिक अन्यायाचं ताजं उदाहरण आहे. 


खरंतर सनातन धर्मावर उदयनिधी यांच्या वक्तव्यावरुन इंडिया आघाडीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. व्हाच हा मुद्दा इंडिया आघाडीला अडचणीचा ठरणार असं वाटत होतं, अशी वक्तव्यं टाळावीत असं ममता बॅनर्जींनी म्हटलं.आता हीच संधी साधत भाजपनं या मुद्द्यावरुन संपूर्ण इंडिया आघाडीला जबाबदार ठरवलंय.  जोपर्यंत या वक्तव्याचा निषेध नाही तोपर्यंत सनातन धर्म संपवणं हा त्यांचा किमान समान कार्यक्रम आहे असं आम्ही मानू, असे  रवीशंकर प्रसाद म्हणााले. 


सनातन धर्म आणि हिंदू धर्म यात जो सूक्ष्म फरक स्टॅलिन सांगू पाहतायत त्यासाठी तामिळनाडूच्या राजकारणाची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. कट्टर ब्राह्मणविरोधावर आधारित द्रविडी चळवळीचा तामिळनाडूच्या राजकारणात प्रचंड प्रभाव आहे. इथल्या सामाजिक संस्कृतीतही त्याचं प्रतिबिंब दिसतं. त्यामुळेच जे वक्तव्य प्रचंड स्पष्टतेनं उदयनिधी स्टॅलिन तामिळनाडूत करु शकतात...तेच भारतात इतरत्र मात्र तितक्या सहजतेनं स्वीकारलं जाणं कठीण आहे. हिंदुत्वाचा, किंवा धार्मिक अजेड्यावर जाणारा कुठलाही मुद्दा हा भाजपसाठी फायद्याच ठरणार हे सांगायला कुठल्या राजकीय विश्लेषकाची गरज नाही. आता स्टॅलिन यांच्या वक्तव्यानं ती संधी भाजपला दिली का हे पाहावं लागेल.


हे ही वाचा :


Sanatan Dharma Controversy : सनातन धर्म म्हणजे काय? हिंदू शब्द कुठून आला? सविस्तर जाणून घ्या...