Ravi Kishan On Population: देशात लोकसंख्या नियंत्रण विधेयकावरून (Population Control Bill) मोठी चर्चा सुरू आहे. देशातील वाढती लोकसंख्या ही चिंतेची बाब बनली असून त्यावर कायदा करण्यासाठी पाऊलं उचलली जात आहेत. त्याचदरम्यान भाजपचे खासदार आणि अभिनेते रवी किशन  (BJP Ravi Kishan On Population Control Bill) यांनी वाढत्या लोकसंख्येला काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. जर काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा केला असता तर मला चार मुलं झाली नसती असं वक्तव्य रवी किशन यांनी केलं आहे. 


आपल्याला चार अपत्यं असल्याने वाढती लोकसंख्या कशी समस्या ठरु शकते याचा अनुभव असल्याचं खासदार रवी किशन यांनी म्हटलं आहे. आज तक या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी म्हटलं की, "मला चार अपत्यं आहेत, यामध्ये माझा कोणताही दोष नाही. काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी जर लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा केला असता तर ही परिस्थिती आलीच नसती, मी चार मुलं जन्माला घातलीच नसती."


वाढती लोकसंख्या ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या असून त्यावर काँग्रेस कधीच गंभीर नव्हती असा आरोप खासदार रवी किशन यांनी केला. काँग्रेसने वेळीच पाऊलं उचलली नाहीत, त्यामुळे भाजपला आता हे विधेयक आणावं लागत असल्याचंही ते म्हणाले. 


Population Control Bill: रवी किशन संसदेत विधेयक सादर करणार 


केंद्र सरकारने देशात लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार आता दोन पेक्षा जास्त अपत्यं जन्माला घातल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणं बंद होणार आहे. गोरखपूरचे भाजपचे खासदार रवी किशन हे लोकसंख्या नियंत्रण खासगी विधेयक मांडणार आहेत.


लोकसंख्या वाढीच्या समस्येचा विचार ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याचा चार अपत्यं असल्याचं वाईट वाटतंय अशी खंतही खासदार रवी किशन यांनी व्यक्त केली. देशातील या आधीचे सरकार जर विचारशील असतं तर आज ही वेळ आली नसती असंही ते म्हणाले. 


भाजपचे खासदार असलेल्या रवी किशन यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्यं आहेत. रवी किशन यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रकात ही माहिती नमूद केली आहे. 


सध्याचे केंद्रातले भाजप सरकार केवळ मंदिरांचे निर्माण करत नाही तर देशातील पायाभूत सुविधांचाही विकास करत असल्याचं खासदार रवी किशन यांनी म्हटलं.