Cyclone Mandous: दक्षिण भारतावर मंदोस चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. या तिन्ही राज्यात हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. तिन्ही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तुफान वाऱ्यासह समुद्र किनाऱ्यावर पाऊस कोसळत आहे. अस्मानी संकटामुळे प्रशासन सतर्क झालं असून एनडीआरएफसह इतर पथके तैणात करण्यात आली आहे. दक्षिण भारतामध्ये येणाऱ्या मंदोस चक्रीवादळाचा फटका शेजारी असणाऱ्या राज्यांना बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक, केरळमधील हवामानात बदल झालाय. महाराष्ट्र, गुजरातमध्येही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 


शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी सकाळपर्यंत मंदोस चक्रीवादळ पश्चिम-उत्तर-पश्चिमकडे सरकणार आहे. त्यानंतर उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळ पोहचेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्यामध्ये यावेळी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. प्रशासन सतर्क झालं असून पावसाचा धोका पाहता तेथे NDRF आणि SDRF च्या 400 जवानांचा समावेश असलेल्या 12 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय बोट, हाय व्होल्टेज मोटर, सकर मशीन, कटर मशीन याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिता लक्षात घेत तामिळनाडूमधील काही शाळा आणि महाविद्यालयामध्ये सुट्टी देण्यात आली आहे.  










महाराष्ट्रालाही फटका -
मंदोस चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र आणि गुजरातलाही बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मुंबई ,पुणे ,ठाणे, रायगड  आणि गोव्याच्या किनाऱ्याजवळ वादळ पुन्हा आले आहे.  त्याचा प्रभाव पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 3, 4 दिवस, काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.